Sameer Wankhede vs Nawab Malik: समीर वानखेडे आणि नवाब मलिक वादात नवा ट्विस्ट; हायकोर्टात भलताच दावा समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:46 PM2021-11-13T19:46:59+5:302021-11-13T19:51:40+5:30

Sameer Wankhede vs Nawab Malik Case high Court: समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात मंत्री नवाब मलिकांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर कोर्टाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरील कारवाईनंतर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असून बनावट जात प्रमाणपत्र दाखवून त्यांनी नोकरी लाटल्याचा आरोप केला होता.

मलिकांनी त्याबाबत समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाहाचे फोटो आणि प्रमाणपत्र ट्विटवरुन सार्वजनिक केले होते. त्यानंतर हा वाद कोर्टापर्यंत गेला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

या सुनावणीदरम्यान मलिक विरुद्ध वानखेडे प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलं आहे. मी पहिल्यापासून ज्ञानदेव वानखेडे असून त्याच नावाची कागदपत्रे आहेत. महार जातीचं प्रमाणपत्रही आहे. माझी पत्नी झाईदा यांनी हिंदू धर्म स्वीकारुन माझ्याशी विवाह केल्याचा दावा ज्ञानदेव वानखेडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

मी कुठेही मुस्लीम धर्म स्वीकारला नाही असं ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात सांगितले आहे. मलिकांनी समीर वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र दाखवलं तेदेखील निराधार असल्याचा आरोप वानखेडेंनी केला. त्यावर कोर्टाने मलिक आमदार आहे. मंत्री आहेत मग जन्मदाखल्याची सत्यता पडताळून जाहीर केला होता का? असा सवाल केला.

यावर मलिकांच्या वकिलांनी मुंबई महापालिकेकडून हा दाखला आला आहे असं कोर्टाला सांगितले. ज्ञानदेव वानखेडे यांना हा दाखला खोटा वाटत असेल तर त्यांनी सिद्ध करावा. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला दाखवावा असं मलिकांची बाजू मांडली.

मलिकांचे वकील कोर्टात म्हणाले की, नवाब मलिकांनी जे काही ट्विट, फोटो जोडले आहेत ते याआधीच वानखेडे कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. ज्ञानदेव वानखेडे यांनीच २०१५ मध्येच दाऊद वानखेडे नावाचं फेसबुक खातं उघडलं होतं मग आम्ही कुठलीही प्रतिमा मलिन केली नाही असं मलिकांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

मी मुस्लीम धर्म स्वीकारला नाही. माझ्या पत्नीनेच हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्याबाबतचं प्रमाणपत्र कोर्टात सादर केलंय का हे पाहणं गरजेचे आहे. तर मलिकांनी मी जी कागदपत्रे जारी केली ती मुंबई महापालिकेकडून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. जर याप्रकरणी हायकोर्टाने नवाब मलिकांविरोधात निर्णय गेला तर त्याचा मोठा फटका मलिकांना बसू शकतो. जन्म दाखल्याबाबत जो युक्तिवाद मलिकांच्या वकिलांनी केला त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

झाईदा या जन्माने मुस्लीम होत्या आणि लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता हा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे वडील हिंदू असतील समीर वानखेडे मुस्लीम कसे असतील असं ज्ञानदेव वानखेडेंनी विचारलं आहे.

दरम्यान, या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, तुम्ही (नवाब मलिक) आमदार, मंत्री आणि एक राष्ट्रीय राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात, मग संबंधित कागदपत्रांचा आधार घेताना तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक नाही का? कारण त्या कागदपत्रांत नंतर अक्षरे घुसडल्याचे सध्या डोळ्यांनाही दिसते. त्यामुळे हायकोर्ट या प्रकरणावर काय निर्णय देतं त्याची उत्सुकता आहे.