महाराष्ट्र अनलॉक! राज्यात नेमकं काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:39 PM2021-08-11T19:39:25+5:302021-08-11T19:50:58+5:30

राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. राज्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार ते जाणून घेऊयात...

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील निर्बंधांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात आता निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणाता शिथिलता देण्यात आली आहे. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्यासाठीच्या हॉटेल मालकांच्या लढ्याला यश आलं आहे. कारण राज्यात आता सर्वच ठिकाणी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स एकूण क्षमतेच्या ५० टक्के सुरू ठेवता येणार आहेत. तसेच शॉपिंग मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश असणार आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबचे निर्णय १५ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

राज्यातील सर्व दुकानं देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. यात दुकानातील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं आहे.

राज्यातील खासगी कार्यालयं आता कर्मचाऱ्यांच्या वेळेच्या व्यवस्थापनासह २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यात कर्मचाऱ्यांचं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण करावं लागणार आहे.

विवाह सोहळ्यासाठी आता खुल्या जागेतील सोहळ्यासाठी एकूण २०० जणांच्या, तर बंद हॉलमधील सोहळ्याला क्षमतेच्या ५० टक्के किंवा एकूण १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात चित्रपटगृह, नाट्यगृह आणि धार्मिक स्थळं अद्याप बंदच राहणार आहेत. याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

याशिवाय राज्यातील शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याबाबत एकमत झालेलं नसल्यानं त्यावरही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

राज्यात ज्यादिवशी दैनंदिन पातळीवर ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी निर्माण होईल त्याच दिवशी तातडीनं कडक लॉकडाऊन करण्यात येणार.

कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकलनं प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना मासिक पास उपलब्ध करून दिले जाणार

राज्यातील जीम आणि स्पा ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी. यात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधन नियमांचं पालन करणं गरजेचं.