'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्...

By मुकेश चव्हाण | Published: February 5, 2021 04:39 PM2021-02-05T16:39:14+5:302021-02-05T16:44:46+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही.

नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंब सोडत नाही. मात्र याचदरम्यान नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवर संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेजचं रविवार 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अमित शहा स्वत: सिंधुदुर्गात येणार आहेत.

मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनानिमित्त नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत फोनवर झालेल्या संवादाविषयी माहिती दिली.

मेडिकल कॉलेजच्या काही फाईल उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात पाठवल्या होत्या. त्यानिमित्त नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन करुन माहिती दिली.

नारायण राणे म्हणाले की, परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असं त्यांना सांगितलं. त्यानंतर माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले बरं. आमच्यात तेवढाच संवाद झाल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अमित शाह यांचा हा कोकण दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र, आता अमित शाह यांनी 6 फेब्रुवारीला कोकणात येण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्याच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.