टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ!

भारतानं ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन ( Tim Paine) याच्याकडून नेतृत्व काढून घेण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

टीम पेननं संपूर्ण मालिकेत खेळलेल्या रडीच्या डावामुळे त्याला भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्याला ट्रोल केले जात आहे.

सिडनी कसोटीत आर अश्विन व हनुमा विहारी यांनी संयमी खेळ करताना ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला आणि सामना अनिर्णीत राखला होता.

सिडनी कसोटीत अश्विनची एकाग्रता मोडण्यासाठी टीम पेनसह ऑसींच्या अन्य खेळाडूंकडूनही स्लेजिंग करण्यात आली. त्याच्या या कृतीवर अश्विननंही सडेतोड उत्तर दिले. पण, पेनचं हे वागण कुणालाच आवडलं नाही आणि त्याच्यावर टीका झाली.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर २-१ असं नाव कोरल्यानंतर भारतीय चाहत्यांना सोशल मीडियावरून टीम पेनला धुण्याची हुक्की आली. त्यात पेनवर आता खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्याची वेळ आल्याचं पाहून चाहत्यांनी पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ते बिग बॅश लीगमध्ये खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाणारा खेळाडू... असा टीम पेनचा प्रवास पाहून सोशल मीडियावर नेटिझन्स भलतेच सुटले आहेत.

बिग बॅश लीगच्या १०व्या पर्वात पेन हरिकेन्स संघाचा सदस्य आहे, परंतु त्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे तो खेळाडूंना पाणी घेऊन जाताना दिसला आहे.