RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचा नाद करायचा नाय...! RRच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोडले लय भारी विक्रम!

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याचं वादळ घोंगावलं. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) ६ बाद १७७ धावांचा पल्ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ( Royal Challengers Bangalore) सहज पार केला. पण, RRच्या राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) सलग दोन धक्के देत सामना चुरशीचा बनवला होता. पण, एबीनं सर्व चित्रच बदललं आणि RCBला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

RRनं रॉबीन उथप्पाला सलामीला पाठवले. IPL 2020त प्रथम सलामीला आलेल्या उथप्पा पूर्वीच्या अंदाजात दिसला. बेन स्टोक्स ( १५) बाद झाला. विराट कोहलीनं ८वे षटक युजवेंद्र चहलच्या हाती सोपवलं. संजू सॅमसननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. पण, याच षटकाच्या चौथ्या व पाचव्या चेंडूवर चहलनं उथप्पा ( ४१) आणि सॅमसन ( ९) यांना बाद केले.

कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी ५८ धावांची भागीदारी करताना RRचा डाव सावरला. स्मिथ आणि राहुल टेवाटिया यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांचा पल्ला गाठून दिला. स्मिथ ३६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर माघारी परतला. टेवाटिया १९ धावांवर नाबाद राहिला. ख्रिस मॉरिसनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात आरोन फिंच ( १४) धावफलकारवर २३ धावा असताना श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर माघारी परतला. RRच्या गोलंदाजांनी RCBच्या धावगतीला लगाम लावला खरा, परंतु त्यांना विकेट घेण्यात अपयश आले.

विराट कोहली आणि देवदत्ती पडीक्कल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RCBच्या डावाला आकार दिला. ही जोडी RCBला सहज विजय मिळवून देईल, असेच चित्र होते. पण, राहुल टेवाटियानं RRला यश मिळवून देताना पडीक्कलला ( ३५) बाद केले. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कार्तिक त्यागीनं RCBचा कर्णधार विराटला बाद केले. राहुल टेवाटियानं सीमारेषेवर अफलातून झेल घेत RCBला दोन धक्के दिले. विराट ४३ धावांवर माघारी परतला.

पण, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सचे वादळ घोंगावलं. जयदेव उनाडकटच्या षटकात त्यानं सलग तीन षटकार खेचले. १२ चेंडूंत विजयासाठई ३५ धावांची आवश्यकता असताना एबीनं १९व्या षटकात २५ धावा चोपून सामना RCBच्या बाजूनं झुकवला.

अखेरच्या षटकात RCBला विजयासाठी १० धावा हव्या होत्या आणि एबीनं त्या सहज करून दिल्या. RCBनं हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली.

एबी डिव्हिलियर्सनं मोडले विक्रम

- IPLमध्ये २५ पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक अर्धशतकं करण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली

- वॉर्नर आणि एबी डिव्हिलियर्स यांनी प्रत्येकी ८ अर्धशतकं २५ पेक्षा कमी चेंडूंत झळकावली आहेत. त्यानंतर किरॉन पोलार्ड ( ७) याचा नंबर येतो.

- एबी डिव्हिलियर्सनं आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ४००० धावा करण्याचा पराक्रमही केला

- एबीनं २३ चेंडूंत पाच वेळा अर्धशतक पूर्ण केले आहे, तर २१, २२ आणि २४ चेंडूंत प्रत्येकी एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे.