रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर दान करतो क्रिकेट किट; जाणून घ्या त्यामागचं कौतुकास्पद कारण

भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत ( Rishabh Pant) यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धडाकेबाज कामगिरी करताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. रिषभला काही सामन्यांत यष्टिंमागे आणि फलंदाज म्हणून अपयश आलं होतं. त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुलला मर्यादित षटकांच्या सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पसंती मिळत होती.

मात्र, रिषभनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दणक्यात कामगिरी केली. त्यानं पाच डावांमध्ये २७४ धावा चोपल्या. सिडनी कसोटीतील ९७ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले,तर गॅबावर नाबाद ८९ धावा करून टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

मैदानावर आक्रमक दिसणारा रिषभ तितकाच भावनिक आहे. प्रत्येक मालिकेनंतर रिषभ पंत त्याचे क्रिकेट किट ज्युनियर्स क्रिकेटपटूंना दान करतो. या युवा खेळाडूंना मदत मिळावी, हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

इंडिया टु़डेला दिलेल्या एका मुलाखतीत पंतनं हा खुलासा केला. BCCIनं करारबद्ध केल्यानंतर रिषभ प्रत्येक मालिकेनंतर क्रिकेट कीट दान करतो. त्यानं सांगितलं की,''मी लहान होतो तेव्हा तारक सर मला फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचे साहित्य द्यायचे. त्याचबरोबर शुजही द्यायचे.''

''भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराही त्यावेळी क्लबमध्ये अशी बरीच मदत करायचा. या सर्व गोष्टींमुळे माझी कारकीर्द घडण्यात हातभार लागला. लहान असताना मलाच बऱ्याच लोकांनी अशी मदत केली. त्यामुळे आता मी हे यश मिळवू शकलो, त्यामुळेच मी अन्य होतकरु मुलांना मदत करु शकतो. त्यामुळेच क्रिकेट कीट युवा आणि गरजू क्रिकेटपटूंना देऊन माझ्याकडून मदत करायचे मी ठरवले आहे,''असेही रिषभ म्हणाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभनं दमदार कामगिरी केली असली तरी यापूर्वी त्या अपेक्षांवर खरं उतरता आलं नव्हतं. तो म्हणाला,''मला प्रत्येक दिवस स्वतःवर दडपण जाणवत होता. तो खेळाचाच भाग आहे. पण, एक व्यक्ती म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा. तुम्ही पुढे जात आहात, म्हणजे तुमच्या खेळात सुधारणा होत आहे. या कठीण प्रसंगी मी हेच शिकलो.''

रिषभनं १६ कसोटी सामन्यांत ४३.५२च्या सरासरीनं १०८८ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकं व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टिंमागे त्यानं ६७ झेल व २ स्टम्पिंग केले आहेत.