India vs Australia, 4th Test Day 5 : रिषभ पंतचा भारी विक्रम, २७ डावांमध्ये मोडला MS Dhoniचा पराक्रम!

India vs Australia, 4th Test Day 5 : रोहित शर्मा ( Rohit Sharma) पहाटेच बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडायला वेळ लागणार नाही, असा अंदाज चुकीचा ठरला. शुबमन गिल ( Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी खेळपट्टीवर नांगर रोवला आणि शतकी भागीदारीसह टीम इंडियाचा डाव सावरला.

गिल जोरदार फटकेबाजी करत होता, तर पुजारा एका बाजूनं विकेट टिकवून खेळतोय. गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी केली, परंतु तोही माघारी परतला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) एक भारी पराक्रम करताना पुजारासह संघर्ष कायम ठेवला आहे.

गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रोहित ७ धावांवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

गॅबाची खेळपट्टी पाहता हे लक्ष्य सोपं नक्कीच नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांचा कस लागणे हे निश्चित आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळालेल्या गिलनं ऑसींचा समाचार घेतला. त्याचे फटके पाहून सारेच अवाक् झाले. कमिन्स, हेझलवूड यांचा चेंडू बॅकफूटवर जाऊन कव्हरच्या दिशेनं तो सहज टोलवत होता.

शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या गिलला माघारी जाताना भारतीयांनी हळहळ व्यक्त केली. इतकी सुरेख फटकेबाजी करणाऱ्या गिलचे शतक व्हायला पाहिजे होते, असे सर्वांना मनोमन वाटत होते. गिल १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांवर बाद झाला. त्यानं पॅट कमिन्सच्या एका षटकात २० धावा चोपून काढल्या.

गिलनंतर आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेनेही आक्रमक खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी पुजाराला जायबंदी करण्याचा डाव कायम ठेवला. जोश हेझलवूडचा एक चेंडू पुजाराच्या अंगठ्यावर एवढ्या जोरात आदळला की त्यानं बॅट फेकली आणि अंगठा पकडून मैदानावर बसला. तो रडायलाच आला होता, पण संघासाठी प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा उभा राहिला.

कर्णधार अजिंक्य रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. त्यानंतर रिषभ पंत मैदानावर आला आणि त्यानं महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा तो सातवा यष्टिरक्षक बनला. रिषभनं २७ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आणि सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या भारतीय यष्टिरक्षकाचा विक्रम नावावर केला. धोनीनं ३२ डावांमध्ये हा पराक्रम केला होता.

फारूख इंजिनियर ( ३६ डाव), वृद्धीमान सहा ( ३७ डाव), नयन मोंगिया ( ३९ डाव), सय्यद किरमानी ( ४५ डाव) आणि किरण मोरे ( ५० डाव) यांनी हा पराक्रम केला आहे. कसोटीत सर्वात जलद ५० बळी ( ११ कसोटी व २२ डाव) आणि सर्वात जलद १००० धावा ( १६ कसोटी व २७ डाव) करणाऱ्या भारतीय यष्टिरक्षकाचा विक्रम रिषभ पंतच्या नावावर आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकनं २१ डावांमध्ये कसोटीत १००० धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा दिनेश चंडीमल ( २२ डाव), इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ( २२ डाव), कुमार संगकारा ( २३ डाव) आणि एबी डिव्हिलियर्स ( २३ डाव) यांचा क्रमांक येतो.