महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर; पत्नी साक्षीनं दिले संकेत, पाहा नव्या घराचे फोटो

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि त्याचे कुटुंबीय लवकरच मुंबईत स्थायिक होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. धोनीची पत्नी साक्षी हीनं मुंबईत तयार होत असलेल्या घराचे फोटो पोस्ट केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. कॅप्टन कूल धोनीनं ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

त्यानंतर धोनी कुटुंबीयांसोबत रांचीच्या फार्महाऊसवरच होता. क्रिकेटमधील करिअर यशस्वी झाल्यानंतर त्याने आधीचं घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन मजली घर खरेदी केलं होतं. या घरात धोनी 8 वर्ष राहीला. 2017 मध्ये धोनी कैलाशपती फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला.

रांची येथे धोनीचा 7 एकरात फार्म हाऊस आहे. त्यात त्यानं आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवलं आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्यासाठी त्यानं मागील महिन्यात 8 लाख किमतीचा ट्रॅक्टरही खरेदी केला.

धोनी मनोरंजन क्षेत्रातही उतरणार आहे आणि गतवर्षी धोनीच्या प्रोडक्शन कंपनीनं एक डॉक्युमेंटरीही लाँच केली होती आणि साक्षी ही त्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यासाठी त्यानं अंधेरीत एक ऑफिसही खरेदी केलं आहे.

आता धोनी मुंबईकर होणार आहे. साक्षीनं सोमवारी तिच्या इंस्टा स्टोरीवर मुंबईत तयार होत असलेल्या घराचे फोटो पोस्ट केले. त्यात त्यांच्या घराचे काम सुरू असल्याचे दिसत आहेत.

साक्षीनं पोस्ट केलेल्या फोटोसारखाच फोटो आर्किटेक्चर डिझायनर शंतनू गर्ग यांनी पोस्ट केला. त्यामुळे धोनी व साक्षी यांच्या स्वप्नातलं घर गर्ग तयार करत असल्याची चर्चा रंगली आहे.