IPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी!

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली.

शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला.

शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. नागरकोटीनं दोन विकेट्ससह दोन झेलही टिपले. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करणाऱ्या शिवम मावीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं होतं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. मॉर्गननं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) 30 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 3) आणि संजू सॅमसन ( 8) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व शिवम मावी यांनी माघारी पाठवले. जोस बटलर आज फॉर्मात वाटत होता. त्यानं दोन खणखणीत षटकारही खेचले, परंतु सातव्या षटकात शिवम मावीनं त्याला चतुराईनं बाद केलं.

रॉबीन उथप्पाला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण, तो 2 धावांवर माघारी परतला. RRने 9 बाद 137 धावा केल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या.

या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला, तर कालपर्यंत दुसऱ्या स्थानी असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ ( DC) थेट अव्वल स्थानावर विराजमान झाला.

दिल्ली, कोलकाता, राजस्थान रॉयल्स ( RR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) यांच्या प्रत्येकाच्या खात्यात चार गुण आहेत. मात्र, आजच्या पराभवानं RRचा नेट रनरेट पडला अन् त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सचा कागिसो रबाडा ( Kagiso Rabada) 7 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. KXIPच्या मोहम्मद शमीच्या नावावरही 7 विकेट्स आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबचा लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनुक्रमे 222 व 221 धावांसह पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.