IND vs ENG : गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद!

By स्वदेश घाणेकर | Published: February 2, 2021 03:15 PM2021-02-02T15:15:50+5:302021-02-02T15:18:39+5:30

भारत आणि इंग्लंड ( India vs England) यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर ( चेपॉक) पहिले दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. पण, गॅबा कसोटीवर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियातील पाच खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

ऑस्ट्रेलियातील गॅबा कसोटीत टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे अंतिम ११ खेळाडू निवडताना अजिंक्य रहाणेची कसोटी लागली होती. पण, त्यातही टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला.

आता इशांत शर्मा तंदुरुस्त झाला आहे आणि तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, आर अश्विन हेही तंदुरुस्त झाले आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. बीसीसीआयनं पहिल्या दोन कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे.

प्रमुख खेळाडू तंदुरुस्त झाल्यामुळे मयांक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना इंग्लंडविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरी करणाऱ्या शुबमन गिल यालाच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मासह सलामीला येण्याची संधी मिळू शकते. विराटचे पुनरागमन झाल्यामुळे मयांक अग्रवालला मधल्या फळीत स्थान मिळू शकत नाही.

आर अश्विन तंदुरुस्त झाल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरची संधी कमी झाली आहे. त्यात कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. अक्षर पटेलही शर्यतीत आहे.

इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह या दोन प्रमुख गोलंदाजांसह टीम इंडिया या सामन्यात मैदानावर उतरू शकेल. हार्दिक पांड्या हा तिसरा पर्याय ठरू शकतो. अशात शार्दूल ठाकूर व मोहम्मद सिराज यांना बाकावरच बसावं लागेल.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन ( India’s Playing XI for 1st Test against England ) - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!