India vs Australia, 3rd Test :टीम इंडियानं १९७९ नंतर केला 'सॉलिड' खेळ, पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्कीची वेळ!

India vs Australia, 3rd Test Day 5 : 'कोण म्हणतं कसोटी क्रिकेट कंटाळवाणं आहे?', व्ही व्ही एस लक्ष्मणच्या या प्रश्नानं सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित अर्धशतक करून माघारी परतला.

पाचव्या दिवशी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्यावरच भिस्त होती. रवींद्र जडेजा, रिषभ पंत दुखापतग्रस्त, त्यात हनुमा विहारीच्या फॉर्मचा काही नेम नाही. अशात अजिंक्य व पुजारा हेच टीम इंडियाचे तारणहार होते. पण, अजिंक्य सकाळच्या सत्रात बाद झाला अन् ऑस्ट्रेलियाला वाटलं विजय आपलाच..

ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग यानं टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला असताना भारतीय फलंदाजांनी त्याच्या मुस्काटात मारणारी कामगिरी करून दाखवली. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्या संयमाची त्याला साथ मिळाली.

मांडीचे स्नायू ताणल्यानंतर धाव घेण्यासाठी संघर्ष करणारा हनुमा विहारी सहाव्या विकेटसाठी आर अश्विनसह खेळपट्टीवर नांगर रोवून राहिला. विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला.

रोहित शर्मानं ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शुबमन गिल ३१ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाले. पुजारानं २०५ चेंडूंत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. रिषभ पंतनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या.

फ्रॅक्चर अंगठा असूनही रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) गरज पडल्यास फलंदाजीला येण्यासाठी सज्ज होताच. विहारीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढली. पण, विहारी खेळपट्टीवर अडून बसला. ऑसी गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा करून आर अश्विनलाही दुखापतग्रस्त करण्याचा प्रयत्न केला. पण, अश्विन व विहारी यांचा संयमी खेळ सुरूच आहे.

ऑस्ट्रेलियात मागील दहा वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक षटकं खेळणाऱ्या संघात टीम इंडियानं तिसरे स्थान पटकावले. भारतानं १२० षटकं खेळली. दिवसाचा खेळ संपण्यासाठी १० षटकं शिल्लक असताना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ऑसी कर्णधार टीम पेन यानं हनुमा विहारीचा झेल सोडला. आजच्या दिवसातील पेनकडून सुटलेला हा तिसरा झेल ठरला.

१९९२नंतर प्रथमच भारताच्या चार फलंदाजांनी कसोटीच्या चौथ्या डावात प्रत्येकी १००+ चेंडूंचा सामना केला. आजच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा ( २०५ चेंडू), रिषभ पंत ( ११८), हनुमा विहारी ( १४९*) आणि आर अश्विन ( ११७*) यांनी ही कामगिरी केली. १९९२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत रवी शास्त्री, अजय जडेजा, संजय मांजरेकर व प्रविण आमरे यांनी अशी कामगिरी केली होती.

१९७९च्या दिल्ली कसोटीनंतर टीम इंडिया प्रथमच चौथ्या डावात १३१ षटकं खेळली. सिडनी कसोटीत भारतानं १३१ षटकांत ५ बाद ३३४ धावा करून सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच आहे आणि १५ जानेवारीपासून चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे.

Read in English