नव्या घराच्या शोधात आहे रिषभ पंत; इरफान पठाणसह नेटिझन्सनं दिला हटके सल्ला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक मालिका विजयात रिषभ पंत ( Rishabh Pant) हे नाव आवर्जुन घ्यायला हवं. गॅबा कसोटीत रिषभनं नाबाद ८९ धावांची खेळी करून टीम इंडियाला २-१ असा विजय मिळवून दिला.

ब्रिस्बेन कसोटीतील मॅच विनिंग खेळीपूर्वी रिषभनं सिडनी कसोटीत ९७ धावांची खेळी केली होती आणि तो खेळपट्टीवर असता, तर कदाचित भारतानं हा सामना जिंकलाही असता. या कामगिरीनंतर रिषभनं टीकाकारांची बोलती बंद केली. प

मायदेशात परतल्यानंतर कुटुंबीय एका गोष्टीसाठी रिषभ पंतच्या मागे लागले आहेत. भारताच्या यष्टिरक्षकानं ट्विट करून ही माहिती दिली आणि त्याचे हे ट्विट व्हायरल झाले आहे.

टीम इंडियाचा आश्वासक यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून रिषभकडे पाहिजे जातेय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाहून मायदेशात परतलेल्या रिषभकडे घरच्यांनी मागणी केली आहे.

''ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून घरी परतलो आहे, तेव्हापासून नवीन घर घेण्यासाठी घरातले मागे लागले आहेत. गुडगांव योग्य राहील का? आणखी काही पर्याय असतील तर सांगा,''असे रिषभनं ट्विट केलं आहे.

त्याच्या या ट्विटवर अनेकांनी भारी सल्ले दिले आहेत, काहींनी त्याला घर जावई होण्यास सांगितले, तर काहींनी विराट कोहलीच्या शेजारी घर घे असे सांगून टीम इंडियातील स्थान पक्के करण्याचा मंत्र दिला.

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यानंही त्याला घर घेण्याऐवजी क्रिकेट ग्राऊंड विकत घेण्याचा विचार का करत नाहीस, असा सवाल केला.