सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #SachinTendulkar; मास्टर ब्लास्टरचे फॅन असाल तर माहित असेल आजच्या दिवसाचं महत्त्व

क्रिकेटचा देव, विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, तेंडल्या अशा विविध नावांनी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी ( Sachin Tendulkar) आजचा दिवस खास आहे. म्हणूनच सोशल मीडियावर #SachinTendulkar ट्रेंड सुरू आहे.

मोठा भाऊ अजित यानं सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थानं दिशा दाखवली. मुंबईच्या शिवाजी पार्क ( आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे सचिननं क्रिकेटचे धडे गिरवले.

सचिन तेंडुलकरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनीही अनेक त्याग केले आणि त्यांच्या त्यागाचं फळ अखेर मिळालं.

वयाच्या 15 व्या वर्षी मुंबईच्या रणजी संघात सचिननं स्थान पटकावलं. पहिल्याच रणजी सामन्यात सचिननं शतक झळकावलं. शालेय क्रिकेटमधील विनोद कांबळीसह त्यानं केलेल्या विक्रमी भागीदारीनं सर्वांचे लक्ष वेधलं.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत सचिनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली. 16 वर्षीय सचिन 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची अवस्था 4 बाद 41 अशी होती.

इम्रान खान, वासीम अक्रम आणि वकार युनिस या तोफखान्यासमोर युवा सचिन पक्क्या निर्धारानं उभा राहिला. सचिननं 15 धावा केल्या. त्यानंतर अनेक वर्ष सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं.

बरोबर 31 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर #SachinTendulkar ट्रेंड सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजारांहून अधिक धावा, शंभर शतक करणारा एकमेव फलंदाज अशी अनेक विक्रम सचिननं नावावर केली.

200 कसोटी सामन्यांत सचिनच्या नावावर 15921 धावा, 463 वन डेत 18426 धावा आणि 1 ट्वेंटी-20 सामन्यात 10 धावा त्यानं केल्या आहेत. कसोटीत 51, तर वन डेत 49 शतकं त्यानं केली आहेत.

Read in English