CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. शारजाहचे स्टेडियम लहान असल्याने प्रत्येकाने बॅटीवर चांगलाच हात आजमावला.

या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले. महेंद्रसिंग धोनीनंही ( MS Dhoni) बॅटवर हात साफ करताना 3 खणखणीत षटकार खेचले. पण, या सामन्यात मोठे लक्ष्य असूनही धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला का आला, हा सर्वांना प्रश्न पडला होता.

आजच्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. याच धावा निर्णायक ठरल्या आणि RRने विजयी सलामी दिली.

सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार व 9 षटकारासह 74 धावा केल्या. स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या. एनगिडीनं अखेरच्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड ब़ॉलही टाकला. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या.

217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) आणि मुरली विजय ( Murali Vijay) यांनी CSKला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. राहुल टेवाटीयानं ही भागीदारी तोडली. त्यानं वॉटसनला त्रिफळाचीत केलं.

वॉटसन 33 धावा ( 1 चौकार व 4 षटकार) करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस गोपाळनं 8व्या षटकात मुरली विजयला ( 21) बाद केलं. सॅम कुरन ( 17) आणि ऋतुराज गायकवाड ( 0) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही. CSKच्या 10 षटकात 4 बाद 82 धावा झाल्या होत्या.

केदार जाधव ( Kedar Jadhav) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी 37 धावांची भागीदारी केली, परंतु टॉम कुरनच्या गोलंदाजीवर जाधव यष्टिंमागे संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. जाधवने 22 धावा केल्या. संजूनं सुपर कॅच घेत CSKला मोठा धक्का दिला.

धोनीनं सॅम कुरन, पदार्पणवीर ऋतुराज गायकवाड, केदार जाधव यांना पुढे खेळण्यास पाठवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. फॅफनं 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता.

धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या.

सामन्यानंतर धोनीनं 7व्या क्रमांकावर येण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला,''मी बराच कालावधी फलंदाजी केलेली नाही. 14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीतही फार मदत मिळाली नाही. शिवाय ही लीगची सुरुवातच आहे आणि त्यामुळे काही नवीन गोष्टींची चाचपणी करायची होती. त्यामुळे सॅमला संधी दिली. आता प्रयोग करण्याची संधी आहे. जर ते यशस्वी झाले नाही, तर आपल्या जुन्हा स्ट्रॅटजीनं मैदानावर उतरू.''