भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच जेम्स अँडरसनचा भीमपराक्रम; टीम इंडियाला दिला इशारा

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवल्यानंतर टीम इंडियाचे शिलेदार विश्रांतीवर आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना तगड्या इंग्लंडचा सामना करायचा आहे. भारतात येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे आणि त्यांनी पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला आहे.

इंग्लंड-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला शुक्रवारपासून सुरूवात झाली आणि कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसननं (James Anderson ) भीमपराक्रमाची नोंद करताना टीम इंडियाच्या फलंदाजांना धोक्याचा इशारा दिला आहे.

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन यानं ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्राथ याचा विक्रम मोडला. त्यानं ३०वेळा कसोटीच्या एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. मॅकग्राथनं २९ वेळा ही कामगिरी केली आहे.

अँडरसननं निरोशान डिकवेल ( ९२), सुरंगा लकमल ( ०), अँजेलो मॅथ्यूज ( ११०), कुसल परेरा ( ६) आणि लाहिरू थिरिमाने ( ४३) यांना बाद करून पाच विकेट्स पूर्ण केल्या. कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे,

श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ( ६७ ) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न ( ३७), न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली ( ३६), भारताचा अनिल कुंबळे ( ३५) आणि श्रीलंकेचा रंगना हेरथ ( ३४) यांचा क्रमांक येतो.

अँडरसननं दुसऱ्यांदा आशिया खंडात पाच विकेट्स घेतल्या. यापूर्वी २०१२मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. या कामगिरीसह आशियात सर्वात अधिक वयात एका डावात पाच विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या रंगना हेरथनं ४० वर्ष व १२३ दिवसांचे असताना ( २०१८मध्ये) हा पराक्रम केला होता.

अँडरसननं ३८ वर्ष व १७७ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो सर्वात वयस्कर जलदगती गोलंदाज आहे. त्यानं रिचर्ड हॅडली यांनी मुंबईत १९८८/८९मध्ये ३८ वर्ष व १४५ दिवसांचे असताना हा विक्रम केला होता.

त्यानं सहावी विकेट घेताच आणखी एक विक्रम केला. आशिया खंडातील त्याची ही पहिलीच कामगिरी आहे. श्रीलंकेत ७ कसोटींमध्ये त्यानं १८ विकेट्स घेतल्या आहेत.

अँडरसनच्या नावावर १५७ सामन्यांत ६०६ विकेट्स आहेत आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.