सोनपावलांनी शहरात झाले गौरीचे आगमन; कोरोनामुळे ऑनलाइन खरेदीला महिलांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:09 IST2020-08-26T00:08:49+5:302020-08-26T00:09:02+5:30
एपीएमसी मार्केटमध्ये गजबज नाही

सोनपावलांनी शहरात झाले गौरीचे आगमन; कोरोनामुळे ऑनलाइन खरेदीला महिलांची पसंती
अनंत पाटील
नवी मुंबई : शहरात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर, मंगळवारी, २५ आॅगस्ट रोजी सोनपावलांनी आलेल्या गौरी मातेचे आगमन झाले. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक महिलांनी आॅनलाइन खरेदीला पसंती देत, गौरीसाठी वस्तू मागविल्या.
नवी मुंबई आणि रायगड परिसरात गौरीचे मंगळवारी सकाळीच आगमन झाले आहे. या वर्षी गौरीपूजन अगदी साधेपणाने करावे लागणार आहे. दरवर्षी गौरीच्या माहेरपणाच्या कौतुकाचे वातावरण आपोआप तयार होते. माहेरवाशीण डोक्यावर सूप घेऊन गौरीला घरभर चालवते. तशी हाताने पावलेही उमटवली जातात. ही पावले तितकीच साजिरी भासतात. यानंतर, गौरीचा मांडव सजविला जातो. फळे, भाज्या, फुले या मांडवाला लावले जाते. दुसऱ्या दिवशी गौरीची साग्रसंगीत पूजा केली जाते. आता शाडू मातीची मूर्ती बनवून घेतात. काही ठिकाणी गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जनासाठी तेरड्याची खास गौरी केली जाते.
कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर एपीएमसी बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली नव्हती. त्यामुळे महिला वर्ग साहित्यांच्या शोधात असल्याचे दिसून आले, तर छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनीही आॅनलाइन मार्ग निवडला आहे. महिलांच्या पसंतीस पडतील, अशा विविध प्रकारांतील नऊवारी साड्या येवला आणि सुरत येथून उपलब्ध केल्याची माहिती कोपरखैरणे गावच्या ज्येष्ठ महिला सुनंदा भरत पाटील यांनी दिली.
महिलांची निराशा
गौराईचा सण हा माहेरवाशिणींचा समजला जातो. मुखवटे तयार करणे, तिला नव्या नवरीप्रमाणे सजविणे, तिच्यासाठी सौभाग्याचे वाण तयार करणे, या कामात महिलांची धांदल उडते. दुसºया दिवशी पूजनाचा वेगळा थाट असतो. नारळाच्या करंज्या, पुरणपोळ्यांचा बेतही असतोच. ही रात्र जागवली जाते. पारंपरिक गाणी, नृत्य आणि आता ब्रास बँड, डीजेच्या तालावर महिला थिरकतात. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने महिलांची पार निराशा झाली आहे.