Sinnar opposes closure of merchant bank | सिन्नर व्यापारी बँक बंद करण्यास विरोध

सिन्नर येथे व्यापारी बॅँकेच्या अंतिम सर्वसाधारण सभेत सभासदांपुढे बोलताना अवसायक एस. पी. रुद्राक्ष.

ठळक मुद्देअंतिम सभा : सभासद आक्रमक; मुदतवाढ फेटाळल्याची माहिती

सिन्नर : सिन्नर व्यापारी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याच्या कार्यवाहीस दहा वर्षे पूर्ण झाल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या बँकेची नोंदणी रद्द करण्यासाठी अवसायक एस.पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात अंतिम सर्वसाधारण सभा झाली. तथापि, नोंदणी रद्द करण्यास सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला.

या बँकेचे पतसंस्था म्हणून अस्तित्व टिकवावे किंवा एखाद्या पतसंस्थेत विलीनीकरण करण्यात यावे, असा प्रस्तावही सभासदांनी मांडला. सन २००९ मध्ये रिझर्व्ह बँकेने बँकेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली व सहकार खात्याने बँकेवर अवसायकाची नेमणूक केलेली आहे. सभेचे अध्यक्ष रुद्राक्ष यांनी विषयांचे वाचन केले. त्याच दरम्यान सभासदांना नोटिसाच मिळालेल्या नसल्याच्या कारणास्तव सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी काही सभासदांनी लावून धरली. रुद्राक्ष यांनी विषय वाचन होऊ द्यावे, त्यानंतर लेखी स्वरूपात म्हणणे मांडावे, अशी सूचना केल्यानंतर सभेला सुरुवात झाली. अवसायक म्हणून मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला होता. तथापि, तो फेटाळण्यात आल्याची माहिती रुद्राक्ष यांनी दिली.
दरम्यान, ज्येष्ठ सभासद कृष्णाजी भगत यांनी या संस्थेने गोरगरिबांचे संसार उभे केलेले आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या पतसंस्थेत विलीनीकरण केल्यास संस्था सुरळीत चालू शकेल, असे सांगितले. डॉ. जी.एल. पवार यांनी ही एक बँक अवसायनात गेल्यामुळे शहरात २० बँका आल्याचे नमूद केले. या संस्थेबद्दल सगळ्यांना आपुलकी असल्याने कायदा मोडून संस्था वाचवावी व सभासदांना दिलासा द्यावा तर अ‍ॅड. शिवाजी देशमुख यांनी नोंदणी रद्दच्या हुकूमाविरोधात किमान दोन हजार ३०० सभासदांच्या सह्यांचा अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे व राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे द्यावा लागेल, अशी माहिती दिली.

भाऊसाहेब शिंदे यांनी, बँकेचे लेखापरीक्षण अहवाल अवलोकनार्थ सभेत ठेवायला हवे होते, असे सांगितले. कायद्याच्या कसोटीत तडकाफडकी निर्णय घेऊन बँकेची नोंदणी रद्द करू नये, सभेत सभासदांनी मांडलेल्या भावना सहकार विभागातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा प्रा.आर.के. मुंगसे यांनी व्यक्त केली. नामकर्ण आवारे यांनी मनोगत व्यक्त केले.

जमा-खर्च मंजुरीचा विषय फेटाळला
बँकेचा गेल्या काही वर्षातला जमा-खर्च व ताळेबंदाला मंजुरीचा विषय सभासदांनी बहुमताने फेटाळला. लेखापरीक्षण अहवाल तसेच जमा-खर्च व ताळेबंद आम्हाला बघायला मिळालेला नसल्याने मंजुरी देता येणार नाही, अशी भूमिका सभासदांच्या वतीने किरण मुत्रक यांनी मांडली. उपस्थित सर्व सभासदांनी हात वर करून त्यास अनुमोदन दिले. दरम्यान, यावेळी रुद्राक्ष यांनी लेखी द्या, अशी आग्रही मागणी केली. तथापि, सभेच्या इतिवृत्तात तशी नोंद करा. प्रत्येकवेळी सभासदांची अडवणूक करू नका, असे माजी नगरसेवक मेहमूद दारूवाला, सोनल लहामगे यांनी सांगितले. त्यानंतर रुद्राक्ष यांनी बँक कर्मचाऱ्याला इतिवृत्त लिहिण्यास सांगितले.

 

Web Title: Sinnar opposes closure of merchant bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.