Distribution of certificates under Maharajaswas Abhiyan | महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप

वासोळ येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यास दाखल्याचे वाटप करताना नायब तहसीलदार विजय बनसोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दगडू भामरे, मुख्याध्यापक शैलेंद्र माहिरे, मंडल अधिकारी राम परदेशी आदी.

ठळक मुद्देदेवळा तालुका : मेशी, लोहोणेर, उमराणे, वासोळ येथे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : महाराजस्व अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या सूचनेप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासकीय शुल्कात दाखले काढून दिले जातात.
दहावीच्या व बारावीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते. आवश्यक दाखले शालेयस्तरावर उपलब्ध व्हावेत याबाबत नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना व तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र संचालकांना सूचना दिल्या.
तालुक्यात उमराणे, लोहोणेर व देवळा अशा तीनही महसूल मंडलांमध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
वासोळ शाळेतही वाटप
वासोळ येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत मेशी येथील आपले सरकार सेवा केंद्रातर्फे शैक्षणिक दाखल्यांची आॅनलाइन नोंदणी केली जाते. राजस्व अभियानांतर्गत फक्त दोन दिवसात दाखल्यांचे वितरण करण्यात येत असल्याने शासनाची ही योजना देवळा तहसीलदार यांच्याकडून परिणाम कारकरित्या राबविली जात असल्याने पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उमराणे येथील आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक जयवंत पाटील यांनी गिरणारे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात व उमराणे येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शैक्षणिक दाखल्यांचे वितरण नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लोहोणेर येथील जनता विद्यालयात सरपंच दीपक बच्छाव व मंडळ अधिकारी राम परदेशी यांच्या हस्ते शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. देवळा येथील आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक योगराज पाटील व लोहोणेर येथील आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक मच्छिंद्र महिरे यांच्या प्रयत्नातून दाखले प्राप्त झाल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.शालेय स्तरावर महाराजस्व अभियान राबवून तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना शासकीय शुल्कात दाखले उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- दत्तात्रेय शेजूळ
तहसीलदार, देवळा

Web Title: Distribution of certificates under Maharajaswas Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.