उपराजधानीत गणेशोत्सवाकरिता दररोज ६० ते ७० लाखांची फुलविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:46 AM2019-08-30T10:46:00+5:302019-08-30T10:46:29+5:30

सीताबर्डीतील नेताजी फूल मार्केटमधील महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, एरवी दरदिवशी १० लाख रुपयांच्या तुलनेत गणेशोत्सवात दरदिवशी ६० ते ७० लाख रुपयांच्या फुलांची विक्री होते.

Sale of flowers of 5 to 3 lakhs per day for Ganesh festival in Nagpur | उपराजधानीत गणेशोत्सवाकरिता दररोज ६० ते ७० लाखांची फुलविक्री

उपराजधानीत गणेशोत्सवाकरिता दररोज ६० ते ७० लाखांची फुलविक्री

Next
ठळक मुद्देदहा दिवसांत होते नारळाची तीन कोटींची उलाढाल

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवाचे वेध लागले असतानाच सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे, आखणीची कामे अधिक वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही तितकीच लगबग सुरू आहे. उत्सव साजरा करण्यासाठी मंडप व्यवस्था, सुरक्षा, दर्शनासाठी येणाऱ्यांसाठी सुविधा पुरविणे, रोषणाई अशी साऱ्याच आघाड्यांवर तयारी वेगात आहे. यातच विविध बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. हार-फुले आणि नारळाच्या बाजारपेठेतील व्यापारी सज्ज आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी सुरू केली आहे. इतवारी बाजारात नारळाची अपेक्षेपेक्षा जास्त आवक आहे, तर सीताबर्डीतील नेताजी मार्केट फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी आगाऊ फुलांची मागणी केली आहे.
नेताजी फूल मार्केटमधील महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, एरवी दरदिवशी १० लाख रुपयांच्या तुलनेत गणेशोत्सवात दरदिवशी ६० ते ७० लाख रुपयांच्या फुलांची विक्री होते. पश्चिम महाराष्ट्रात सजावटीसाठी नैसर्गिक फुलांचा उपयोग करण्यात येतो. या फुलांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ सांगली आणि सातारा येथे किमती वाढल्या आहेत. मुंबई आणि पुणे येथे प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आहे. पण नागपुरात काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवात सजावटीसाठी प्लास्टिक फुलांचा उपयोग करण्यात येत असल्यामुळे नैसर्गिक सजावटीच्या फुलांची विक्री कमी झाली असून किमतही घसरण झाली आहे. गणेशोत्सवासाठी फुलांची आवक वाढली आहे. गणेशमूर्तीची १ सप्टेंबरला स्थापना होणार असल्यामुळे ३१ ऑगस्टला गर्दी राहील. त्यामुळे किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
५ सप्टेंबरला गौरीपूजन असल्यामुळे हारांचे भाव दुप्पट होतील, असे रणनवरे म्हणाले. ते म्हणाले, सध्या नागपुरात फुलांच्या भावात ३० टक्के वाढ तर मुंबई आणि पुणे येथे भाव दुपटीवर गेले आहेत. गौरीपूजनात निशिगंधा फुलांला जास्त मागणी असते. या दिवसात भाव दुप्पट अर्थात ४०० ते ५०० रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.

तयार फुलवाती बाजारात
सध्या तयार फुलवातीची बाजारपेठ वाढली आहे. कापसापासून घरीच फुलवाती तयार करण्याऐवजी बाजारात तयार मिळणाऱ्या फुलवाती खरेदीवर गृहिणींचा जास्त भर आहे. नागपुरात बचत गटांतर्फे निर्मिती करण्यात येते.

नारळाच्या किमती स्थिर, गणेशोत्सवात तीन कोटींची विक्री
इतवारीतील नारळाचे ठोक व्यापारी घनश्याम छाबडिया यांनी सांगितले की, गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या तुलनेत यंदा ओला आणि सुक्या नारळाच्या किमतीत वाढ झालेली नाही. श्रावण आणि रक्षाबंधनापासून नारळाची मागणी वाढते. दिवाळीपर्यंत विक्रीत वाढ होत असते. पण यावर्षी प्रारंभपासूनच ग्राहकी नसल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या सणांमध्ये ५० टक्के विक्री कमी आहे. छाबडिया म्हणाले, दहा वर्षांपूर्वी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ इतवारीतील पाच ते सहा व्यापारी दरदिवशी जवळपास २२ ते २५ ट्रक नारळ विक्रीसाठी बोलवायचे. आम्ही दररोज १२ ते १३ ट्रकची विक्री करीत होतो. इतवारीतून संपूर्ण विदर्भात आाणि लगतच्या राज्यात नारळ विक्रीसाठी जायचे. पण आता विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी एकत्रितरीत्या नारळ विक्रीसाठी बोलावू लागेल. त्याचा विक्रीवर परिणाम झाला.

पुणे, बेंगळुरू, सातारा, सांगलीतून आवक
सध्या सजावटीच्या फुलांमध्ये जरबेराचे (१० फूल बंडल) ५० ते ६० रुपयांत असून सांगली, सातारा आणि स्थानिक उत्पादकांकडून दररोज ५०० ते ६०० बंडलची आवक आहे. कार्नेशन (२० फूल) २०० ते २२० रुपये, बेंगळुरू व उटी येथून आवक, लिलियम अ‍ॅसिएटिक (१० फूल) ३२० ते ३५० व लिलियम ओरिएन्टल (१० फूल) ६५० ते ७०० रुपये, बेंगळुरूहून आवक, आर्किड (२० फूल) ५०० रुपये, सांगली, साताराहून आवक, डच गुलाब (२० फूल) १०० ते १२० रुपये भाव असून मुंबई, पुणे, बेंगळुरूहून आवक आहे. पूजेच्या फुलांमध्ये झेंडूची फुले ऑरेंज, पिवळा आणि गोल्डन रंगात ठोक बाजारात साधा झेंडू २० ते ४० रुपये किलो, कोल्हापूर व स्थानिकांकडून आवक, कोलकाता झेंडू ५० ते ६० रुपये किलो, निशिगंधा २०० ते २५० रुपये किलो, शेवंती २५० ते ३०० रुपये, बेंगळुरू व बाळापूरहून आवक, देशी गुलाब ४० ते ५० रुपये, स्थानिकांकडून आवक, डिवाईन गुलाब ८० ते १०० रुपये, शिर्डीहून आवक, कुंदा/जाई ४०० ते ५०० रुपये किलो असून नांदेड आणि स्थानिकांकडून आवक आहे.

Web Title: Sale of flowers of 5 to 3 lakhs per day for Ganesh festival in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.