Domestic Ganpati is less than 2 feet and public Ganpati is less than 4 feet | घरगुती गणपती २ फुट तर सार्वजनिक ४ फूटाहून कमीच

घरगुती गणपती २ फुट तर सार्वजनिक ४ फूटाहून कमीच

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शन सूचना जारीसोशल मीडियावर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शहरी भाग वगळता नागपूर जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे तसेच सजावटदेखील जास्त आकर्षक ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटाच्या मर्यादेतील असावे. नागरिकांनी पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे.
गणेशोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, असेदेखील जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गणेश दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असेदेखील सार्वजनिक मंडळांना आवाहन करण्यात आले आहे.

शक्य असल्यास विसर्जन पुढे ढकला
घरी विसर्जनाची सोय नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जन किंवा पुढील वर्षी अनंत चतुर्दशीला विसर्जन करावे, असेदेखील या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

थर्मल स्क्रीनिंग व्हावे
गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या
भाविकांकडून कोरोनाच्या बाबतीतील सर्व नियम पाळले जात आहे की नाही याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Domestic Ganpati is less than 2 feet and public Ganpati is less than 4 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.