मनपा : बजेट विलंबावर पदाधिकारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 08:58 PM2021-03-06T20:58:03+5:302021-03-06T21:01:14+5:30

NMC budget delay,Officials angry आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अद्याप स्थायी समितीला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा सुधारित व २०२१-२२ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केलेला नाही. यावर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Corporation: Officials angry over budget delay | मनपा : बजेट विलंबावर पदाधिकारी नाराज

मनपा : बजेट विलंबावर पदाधिकारी नाराज

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्तांच्या बजेटची प्रतीक्षा : वित्त व लेखा विभागात सक्षम अधिकारी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्यासह मनपातील पदाधिकारी यांच्यात अधिकाराच्या मुद्यावरून चांगलाच संघर्ष पेटला होता. पदाधिकाऱ्यांनी मनपा कायद्याचा अभ्यास करून मुंढे यांनी वेळेत बजेट न मांडल्याने त्यांच्यावर तुटून पडले होते. कायद्यानुसार दरवर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांनी सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करून ३१ मार्चपूर्वी बजेट अंतिम मंजुरीसाठी सादर करणे अपेक्षित आहे. मात्र आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अद्याप स्थायी समितीला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा सुधारित व २०२१-२२ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केलेला नाही. यावर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा मागील दोन-तीन वर्षात मोडित निघाली आहे. वित्त विभागात सक्षम अधिकारी नाही. मागील काही वर्षांपासून बजेट अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. दरवर्षी मनपा अर्थसंकल्पासाठी मदत करणारे अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने अनुभवी अधिकारी नाही. वित्त व लेखा अधिकारी बजेटसाठी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत असल्याची माहिती आहे.

आयुक्तांच्या अर्थसंकल्पातून महापालिकेच्या आर्थिक स्थिती स्पष्ट होते. यातून तिजोरीत जमा होणारा महसूल व आवश्यक खर्च यानंतर शिल्लक निधीनुसार स्थायी समितीला शहरातील विकास कामांना मंजुरी देण्याचे नियोजन करणे शक्य होते.

दोन वर्षापासून कामे ठप्प

महापालिकेची आर्थिक स्थिती व कोविडमुळे गेल्या दोन वर्षात शहरातील विकास कामे ठप्प आहेत. प्रभागातील नाल्या व गडरलाईन दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मागील निवडणुकीत दिलेले विकासाचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना जाब विचारायला पाहिजे. अशा परिस्थितीत पुढील वर्षात निवडणुकीला सामोरे कसे जाणार, असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत बजेट अपेक्षित होते

मनपा कायद्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांनी बजेट सादर करणे अपेक्षित होते. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली करून तातडीने बजेट सादर करण्याची सूचना केली. त्यांनी दोन-तीन दिवसात बजेट सादर करणार असल्याची माहिती दिली. लवकरच ते बजेट सादर करतील, अशी आशा आहे.

 अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, मनपा

विकास कामावर परिणाम

महापालिका नियमानुसार आयुक्तांनी बजेट सादर करणे अपेक्षित आहे. आधीच दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प आहेत. त्यात बजेटला विलंब होत असल्याने याचा विकास कामांवर परिणाम होत आहे.

- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते मनपा

१५ तारखेपर्यंत बजेट सादर करणार

२०२०-२१या आर्थिक वर्षाचा सुधारित व २०२१-२२ या वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पाचे काम सुरू आहे. या आठवड्यात ते तयार होईल. १५ मार्चपर्यंत सादर केले जाईल.

- राधाकृष्णन बी. आयुक्त मनपा

Web Title: Corporation: Officials angry over budget delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.