मेट्रोचा वेग वाढणार कधी ?

By Admin | Updated: June 8, 2015 03:35 IST2015-06-08T03:35:27+5:302015-06-08T03:35:27+5:30

अल्पावधीतच पसंतीस उतरलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असतानाच याच मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला.

When will the speed of the metro be increased? | मेट्रोचा वेग वाढणार कधी ?

मेट्रोचा वेग वाढणार कधी ?

मुंबई : अल्पावधीतच पसंतीस उतरलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असतानाच याच मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला. मेट्रो आणखी जलद धावण्यासाठी ताशी ८0 किलोमीटर वेगाचा प्रस्ताव मेट्रो प्रशासनाने तयार केला आणि तो पाच महिन्यांपूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना सादर करण्यात आला. मात्र त्यावर काही प्रश्न उपस्थित करीत मेट्रोची पाहणी करण्याची इच्छा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मेट्रो प्रशासनाकडे व्यक्त केली. त्यावर अद्याप मेट्रोकडून उत्तर आलेले नसल्याने वेगाचा प्रस्ताव लटकल्याचेच समोर आले आहे.
४ हजार ३२१ कोटी रुपयांचा आणि ११.४0 किलोमीटर लांबीचा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्प ८ जून २0१४ रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. तत्पूर्वी आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) या मेट्रोच्या वेगाची चाचणी करण्यात आली होती. मेट्रोची चाचणी घेताना ती ताशी ८0 किलोमीटर वेगाची घेण्यात आली. मात्र त्याला अखेरची परवानगी ताशी ५0 किलोमीटर वेगाची देण्यात आली. मेट्रोच्या रुळावर पडणारा ताण किती आहे, हे बघण्यासाठी एक यंत्रणा बसवण्यात आली असून, त्याची माहिती घेण्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सांगण्यात आले होते. यात एकाच डब्यावर पडणारा प्रवाशांचा ताण आणि इतर तांत्रिक बाबींचा समावेश होता. या सर्व गोष्टींची माहिती घेऊन ती रेल्वे बोर्डाला सादर केल्यानंतरच वेग वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला होता.
मेट्रो सुरू होऊन सहा महिने उलटल्यावर वेग वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रस्ताव तयार केला आणि तो नोव्हेंबर २0१४ मध्ये रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे पाठवला. त्यानंतर बक्षी यांनी मेट्रोच्या वेगाची परवानगी देताना कुठल्या अटी होत्या, मेट्रोची देखभाल आणि दुरुस्ती कशी केली जाते, सुविधा कशा आहेत हे आणि अन्य तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आणि त्याचे उत्तर मेट्रो प्रशासनाकडे मागितले. हे प्रश्न उपस्थित करतानाच मेट्रोची पाहणी करण्याची इच्छा मेट्रो प्रशासनाकडे व्यक्त केली. मात्र त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत पश्चिम आणि मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, मेट्रो प्रशासनाचा ताशी ८0 किलोमीटर वेग वाढवण्याच प्रस्ताव आहे. मात्र मी काही तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. जर वेग वाढवायचा असेल तर त्याची पाहणी करणे गरजेचे आहे आणि तशी मागणीही केली, परंतु अद्याप उत्तर आलेले नाही.(प्रतिनिधी)

> घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरावी, यासाठी मेट्रोचे भाडे सुरुवातीला फक्त १० रुपये ठरवण्यात आले. कुठल्याही स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी फक्त १० रुपये आकारणी केली जात असल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरवासीयांनी मेट्रोचा पुरेपूर आनंद लुटला. महिनाभरासाठी १० रुपये आकारणी असल्याने मेट्रो प्रशासनाला याचा पुरेपूर आर्थिक फायदाही झाला.

> मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला. तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रवाशांचा आकडा आणखीच वाढून तो ५ लाख एवढा झाला. त्यामुळे सुरुवातीला मेट्रोतून १ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर प्रवास भाड्यात अल्पशा वाढ करण्यात आली; तरीही मेट्रोचे प्रवासी काही कमी झाले नाहीत.

> मेट्रो सेवेमुळे पश्चिम रेल्वेलाही त्याचा चांगलाच फायदा झाला. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात उतरून मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील स्थानक गाठावे लागत असल्याने एकच गर्दी दादर स्थानकात होत होती. मात्र आता मेट्रोमुळे दादर स्थानकापर्यंत प्रवासी न जाता अंधेरी स्थानकात उतरून मेट्रोने घाटकोपरपर्यंत प्रवास करतात आणि डाऊनला ट्रेन पकडतात. त्याचप्रमाणे काही प्रवासी हे सीएसटीकडे जाण्यासाठीही हाच पर्याय निवडतात.

> त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या एका डब्यातील प्रवासीसंख्या कमी झाली असून, प्रवाशांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगण्यात येते. २00७ रोजी प्रत्येकी एका डब्यातून २८७ प्रवाशांचा प्रवास होत होता. आता २0१४ च्या अखेरीस हीच संख्या २२७ एवढी झाली आहे.

Web Title: When will the speed of the metro be increased?