शिंदेसेनेचे नेते राऊतांचे स्वागत करतात तेव्हा...
By अजित मांडके | Updated: May 4, 2026 05:53 IST2026-05-04T05:51:50+5:302026-05-04T05:53:12+5:30
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचे उदाहरण नुकतेच ठाण्यात दिसून आले आहे. दोघे कट्टर राजकीय विरोधक. शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांवर धारदार टीकेचे बाण सोडले जाणे नित्याचेच.

शिंदेसेनेचे नेते राऊतांचे स्वागत करतात तेव्हा...
अजित मांडके, मुख्य उपसंपादक
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचे उदाहरण नुकतेच ठाण्यात दिसून आले आहे. दोघे कट्टर राजकीय विरोधक. शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांवर धारदार टीकेचे बाण सोडले जाणे नित्याचेच. मात्र, दोघांनी काही काळासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवल्याचे दिसून आले. उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. ठाण्यात संजय राऊत यांना पाय ठेवू देणार नाही, अशा गर्जना करणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदारांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे. शिवसेना दोन गटांत विभागल्यानंतर आजही ठाण्यावर शिंदेंचाच वरचष्मा आहे. याच ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली होती; परंतु काही वर्षांपासून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर आगपाखड करताना दिसतात. काही वेळेला तर प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचल्याचेही ठाणेकरांनी पाहिले आहे. खा. राऊत यांच्या टीकेला म्हस्के प्रत्युत्तर देतात. टीका-टिप्पणीनंतर वाद शांत होतात; परंतु कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण होतात. सार्वजनिक ठिकाणी किंवा राजकीय मिरवणुकीत विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षांचे नेते एकमेकांशी संवाद साधणेही टाळतात. शिवसेनेची वाताहत होण्यास राऊत हेच जबाबदार असल्याची टीका शिंदेसेनेच्या नेत्यांकडून केली जाते. म्हस्के आणि राऊत यांना नेहमीच एकमेकांवर टीका करताना दिसतात.
परंतु, कितीही टोकाचे मतभेद असले तरी, कौटुंबिक नातेसंबंध राखण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचा प्रत्यय या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आला. म्हस्के यांचे पुत्र आशुतोष यांचा हर्षदा यांच्याशी विवाह झाला. स्वागत समारंभाला राऊत आले होते. म्हस्के यांच्या मुलाच्या लग्नामध्ये राऊत यांची एन्ट्री होताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या, तसेच म्हस्के यांनी शाल व पुष्पगुच्छ देत राऊत यांचा व्यासपीठावर सन्मान केला. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी राऊत यांना व्यासपीठावर आणले. पवार यांनीही आस्थेने राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हात धरून गर्दीतून वाट काढत त्यांना व्यासपीठावर नेले. राजकीय मतभेद कितीही टोकाचे असले तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असून, राऊत यांनी अगदी मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राऊत आणि म्हस्के यांनी राजकारणाचे जोडे बाहेर तर काढलेच, शिवाय राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हे देखील दाखवून दिले.