विनीत गेरेलानी, आयुषच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ड्रग्ज पुरवठादारांशी संबंध असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:55 IST2026-05-09T11:53:34+5:302026-05-09T11:55:08+5:30
शुक्रवारी पोलिसांनी गेरेलानी आणि साहित्य यांना न्यायालयात हजर केले आणि पुढील कोठडीची मागणी केली नाही. त्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले.

विनीत गेरेलानी, आयुषच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ड्रग्ज पुरवठादारांशी संबंध असल्याचा संशय
मुंबई : नेस्को ड्रग्ज प्रकरणात बोरिवली न्यायालयाने शुक्रवारी विनीत गेरेलानी (वय २२) आणि आयुष साहित्य (२४) यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघेही आधीपासून न्यायालयीन कोठडीत होते. मात्र, मुख्य पुरवठादार मार्क ऊर्फ महेश खेमलानी (४४) याला अटक केल्यानंतर वनराई पोलिसांनी ४ मे रोजी पुन्हा ताब्यात घेऊन खेमलानीसमोर चौकशी केली होती.
शुक्रवारी पोलिसांनी गेरेलानी आणि साहित्य यांना न्यायालयात हजर केले आणि पुढील कोठडीची मागणी केली नाही. त्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. गेरेलानीसाठी ॲड. भोजराज जेसवानी, तर साहित्यसाठी ॲड. रंजिता जैन यांनी बाजू मांडली. ॲड. जेसवानी यांनी सांगितले की, गेरेलानी यांनी आधीच १२ दिवस पोलिस कोठडी भोगली असून, पोलिसांनी स्वतः न्यायालयीन कोठडीची मागणी केली.
ॲड. जैन यांनी सांगितले की, पोलिसांनी स्वतः न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने कोणताही युक्तिवाद झाला नाही. त्यांनी म्हटले, पोलिसांचा दावा आहे की, साहित्यला एक्स्टसी गोळ्यांचे पार्सल मिळाले. मात्र, त्याने स्वतः कोणतेही पार्सल स्वीकारले नसून, दुसऱ्या व्यक्तीने ते पार्सल घेतले होते. फक्त साहित्यची ओळख असल्याने त्याने पार्सल मागविले होते, असे म्हणता येणार नाही.
पोलिसांनी १ मे रोजी खेमलानी याला थायलंडहून मुंबईत परतल्यानंतर अटक केली होती.
असे पाठविले ड्रग्ज
खेमलानीने युरोपस्थित मित्राकडून ४ हजार एक्स्टसी गोळ्या मागविल्या. व्यवहारासाठी त्याने यूएसडीटी वॉलेट वापरल्याचेही समोर आले. त्याने ड्रग्ज मागवून ते सहआरोपी साहित्यच्या उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मित्राच्या पत्त्यावर पाठविल्याचा संशय आहे.
ड्रग्ज पुरवठादारांशी संबंध असल्याचा संशय
खेमलानी, साहित्य आणि युरोपस्थित पुरवठादार यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
तसेच, घटनेपूर्वी खेमलानी, गेरेलानी आणि साहित्य यांची गोव्यातही भेट झाली होती. या तिघांचे इतर ड्रग्ज पुरवठादारांशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
१२ आरोपींना अटक
या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. खेमलानीला १० मे, तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणातील अनेक संशयितांसाठी ॲड. सुरेंद्र लांडगे, ॲड. आझाद गुप्ता आणि ॲड. रंजिता जैन यांनी बाजू मांडली.