महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून ईडीचे अधिकारी राज ठाकरेंना प्रश्न विचारणार आहेत. हा सगळा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मनसेसह सर्वच भाजपाविरोधी पक्षांकडून होत असला तरी, मनसैनिकांच्या मनात एक धाकधुक नक्कीच आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने ईडी कार्यालयापर्यंत जाणं यातून त्यांची काळजीही दिसते. त्यामुळे आता आईचा आशीर्वाद, भावाच्या शुभेच्छा अन् नऊ नंबरची कार राज ठाकरेंसाठी 'लकी' ठरते का, याबद्दल उत्सुकता आहे.

ईडीच्या चौकशीला सामोरं जाणाऱ्या राज ठाकरे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 'कृष्णकुंज'वरून निघाले. ते निवासस्थानाबाहेर आले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची आई होती. त्यांनी हसतमुखाने पाठीवर हात ठेवत राज ठाकरेंना जणू आशीर्वादच दिला. त्यानंतरच राज ठाकरे आपल्या कारमध्ये बसले.

कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना राज यांनी नऊ नंबरची लँड क्रूझर निवडल्याचं अनेकांनी पाहिलंय. 'नऊ' हा आकडा राज ठाकरेंचा लकी नंबर मानला जातो. अंकशास्त्रावर राज यांचा विश्वास आहे. ठाकरे आडनावाचं स्पेलिंग (Thackeray), मनसेच्या स्थापनेची तारीख (९ मार्च), शिवसेना सोडल्याची तारीख (२७ नोव्हेंबर) पाहिल्यावर राज यांचं नऊ नंबरवरचं प्रेम सहज लक्षात येतं. त्यांच्या कारच्या नंबर प्लेटवरील नऊ आकडाही लक्ष वेधून घेणारा आहे. त्यापैकी टोयोटा लँड क्रूझर ही त्यांची फेव्हरिट कार आहे. अनेक दौरे, सभांसाठी जाताना त्यांनी या कारमधूनच प्रवास केला आहे. आजही ते याच कारमधून ईडी कार्यालयात पोहोचलेत. 

आईचा आशीर्वाद आणि नऊ नंबरच्या कारप्रमाणेच ज्येष्ठ चुलत बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छाही राज यांच्या पाठीशी आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असल्यानं शिवसेना या प्रकरणी काय भूमिका मांडते, याबद्दल उत्सुकता होती. अखेर काल उद्धव यांनी ईडी नोटीशीबाबत मौन सोडलं. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, सकाळी साडेदहा वाजता घरून निघालेले राज ११.२० वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. ईडी कार्यालयापासून जवळच असलेल्या ग्रँड हॉटेलमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि मनसेचे काही प्रमुख नेते थांबले आहेत. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबई, ठाण्यातील काही मनसे नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. गेले दोन दिवस कोहिनूर मिल प्रकरणी उन्मेष जोशी यांची ईडीने चौकशी केली. ही चौकशी जवळपास सात ते आठ तास चालली. आता राज यांना किती प्रश्न विचारले जातात आणि किती वेळ त्यांची चौकशी केले जाते, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

  

Raj Thackeray ED Notice Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'

Raj Thackeray ED Notice : मनसैनिकांचा नवा फंडा; 'टी-शर्ट मेसेज'मधून मोदी सरकारवर हल्ला

Web Title: Video: raj thackeray reached Ed office in his lucky car with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.