वडील ओरडले म्हणून गाठले उत्तर प्रदेश

By Admin | Updated: June 21, 2016 02:54 IST2016-06-21T02:54:34+5:302016-06-21T02:54:34+5:30

अभ्यासावरुन वडील ओरडले म्हणून १६ वर्षीय मुलाने थेट उत्तरप्रदेश गाठल्याची घटना सोमवारी नागपाड्यात उघडकीस आली.

Uttar Pradesh, as the father shouted | वडील ओरडले म्हणून गाठले उत्तर प्रदेश

वडील ओरडले म्हणून गाठले उत्तर प्रदेश

मुंबई : अभ्यासावरुन वडील ओरडले म्हणून १६ वर्षीय मुलाने थेट उत्तरप्रदेश गाठल्याची घटना सोमवारी नागपाड्यात उघडकीस आली. नागपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच तपास पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले आहे.
नागपाडा परिसरात १६ वर्षीय सोनू (नावात बदल) कुटुंबियांसोबत राहतो. तो अकरावीत शिकतो. १७ जून रोजी कॉलेजमधून घरी आल्यानंतर वडील त्याला अभ्यासावरून ओरडले. दिवसभर मित्रांसोबत न खेळता अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. याच रागात खेळायला जातो असे सांगून सोनू घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी नागपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अधिक शोध सुरू केला.
हा शोध सुरू असताना सोनू उत्तरप्रदेशमध्ये असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे कुटुंबियांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानुसार वरीष्ठ निरीक्षक संजय बसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अधिक तपास सुरू केला. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी सोनूला ताब्यात घेतले आहे. त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी त्यांचे एक तपास पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Uttar Pradesh, as the father shouted