कलात्मकतेचा अनोखा प्रवास!

By Admin | Updated: June 8, 2015 03:51 IST2015-06-08T03:51:17+5:302015-06-08T03:51:17+5:30

रूढ, प्रस्थापित पाश्चात्त्य शैलीचा त्याग करून लोककलेचा केलेला आविष्कार हा जामिनी रॉय यांच्या केवळ व्यक्तिगत नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच नवे वळण देणारा ठरला.

The unique journey of artistry! | कलात्मकतेचा अनोखा प्रवास!

कलात्मकतेचा अनोखा प्रवास!

मुंबई : रूढ, प्रस्थापित पाश्चात्त्य शैलीचा त्याग करून लोककलेचा केलेला आविष्कार हा जामिनी रॉय यांच्या केवळ व्यक्तिगत नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच नवे वळण देणारा ठरला. म्हणूनच भारतीय कलेचा प्रारंभीचा आधुनिक कालखंड घडविण्यात ज्यांचा हातभार लागला, त्यात जामिनी रॉय यांचे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या आयुष्यातील हाच प्रवास ‘जर्नी टू द रुट्स’ या कलाप्रदर्शनातून उलगडण्यात आला आहे.
नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट या गॅलरीत नुकतेच जामिनी रॉय ‘जर्नी टू द रुट्स १८८७- १९७२’ कलाप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टच्या अध्यक्षा डॉ. फिरोजा गोदरेज यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात रॉय यांच्या ‘बाउल’, ‘संथाळ’, ‘माला’ या चित्रमालिका, माता आणि बालक या विषयांवर व ख्रिस्त जीवनावरील चित्रे अशा एकूण २०० हून अधिक चित्रांचा समावेश आहे. यावेळी गोदरेज यांनी सांगितले की, रॉय यांच्या चित्रांचे विषय कायम वास्तव जीवनाशी निगडीत असत. शिवाय, त्यांना पाश्चात्त्य शैलीतील आविष्कारात आंतरिक समाधान वाटत नव्हते. या आंतरिक संघषार्तून वयाच्या ३४ व्या वर्षी स्वतंत्र व सुलभ शैली शोधण्यास सुरुवात केली. आजच्या पिढीनेही स्वत:ची शैली शोधून वेगळ््या वाटांचा विचार करावा या उद्देशाने कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रॉय यांनी आपल्या संस्कृतीच्या गुणविशेषांचा विसर पडू न देता कलाविश्वात वेगळी ओळख निर्माण केल्याचा उल्लेखही गोदरेज यांनी आर्वजून केला.
रॉय यांनी आपल्या कलाकृतींतून स्थानिक लोकांचे केलेले रेखाटन सर्वोत्कृष्ट आहे. इतर कोणत्याही कलाकारांच्या कलाकृतींत इतके सूक्ष्म निरीक्षण आणि अचूकता आढळत नाही. रॉय यांनी विविध सिरीजमधून आदिवासी, महिला यांना एका वेगळ््याच दृष्टिकोनातून कॅनव्हासवर रेखाटले. त्यामुळे कलेतील हे बारकावे, एकाग्रता आणि निष्ठा आजच्या पिढीसमोर यावी, यासाठी या प्रदर्शनाच्या क्युरेटींगची जबाबदारी घेतल्याचे क्युरेटर इला दत्ता यांनी सांगितले. शिवाय, रॉय यांचे कलाविश्वातील योगदान अधोरेखित करताना कलेतील भारतीयत्वाच्या प्रसारासाठी जास्तीत जास्त घरात चित्रे पोहोचावीत म्हणून आपल्या एकाच कलाकृतीच्या अनेक प्रती ते स्वत: रंगवीत असत व त्या अत्यंत अल्प किंमतीला विकत असत अशी त्यांच्याबद्दलची आठवण सांगितली. हे प्रदर्शन १२ जुलैपर्यंत कुलाबा येथील नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहील. (प्रतिनिधी)

Web Title: The unique journey of artistry!