Join us

"सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 12:56 IST

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे.

मुंबई: राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. 

उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान, सध्याच्या या घडामोडींचा दाखला देत भाजपासोबत सत्तेत असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे.

रामदास आठवले ट्विटरद्वारे म्हणाले की, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत. मध्यप्रदेश नंतर राजस्थानमधील काँग्रेसची सत्ता जाऊन तेथे भाजपाची सत्ता स्थापन होईल. त्यानंतर महारष्ट्रात देखील सत्तांतर घडण्याची शक्यता आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही. मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार गेलं. याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपाचं सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभं राहावं, असं रामदास आठवले यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीबद्दल देखील रामदास आठवले यांनी भाकित केले आहे. राजस्थानात भाजपाचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राची वेळ येईल. महाराष्ट्रातलं सरकार फार टिकणार नाही. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार लवकरात-लवकर जाईल आणि महाराष्ट्रातही भाजपाचं सरकार येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या-

Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली!

'आमचं सरकार भक्कम; आमदार फुटलाच तर...'; राजस्थानमधील घडामोडीनंतर ठाकरे सरकारची प्रतिक्रिया

सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

 

टॅग्स :सचिन पायलटरामदास आठवलेनरेंद्र मोदीभाजपाकाँग्रेसराजस्थानमहाराष्ट्र विकास आघाडीउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार