Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:22 IST2025-12-24T11:22:08+5:302025-12-24T11:22:55+5:30
Shiv Sena UBT MNS Alliance PC: या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्रित अभिवादन करून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार आहे

Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उद्धवसेना-मनसे यांच्या राजकीय युतीची आज घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच राजकीय युती करत असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठी माणूस आणि मराठी माणसांची ताकद एकवटली असून महायुतीला आव्हान देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत अशी कार्यकर्त्यामध्ये भावना आहे.
वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. तत्पूर्वी विविध महापालिकेतील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्रितपणे या घोषणेनंतर जल्लोष साजरा करणार आहेत. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक एकत्र येत असल्याची भावना शिवसैनिक, मनसैनिकांमध्ये आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसाठी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये व्यासपीठ उभारले आहे. त्या व्यासपीठावर २ खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. त्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, मनसेचे रेल्वे इंजिन आणि उद्धवसेनेच्या पक्षाची मशाल याचा बॅनर लावण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्रित अभिवादन करून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे यासारख्या महापालिकेत या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होणार आहे. तब्बल २ दशकानंतर ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येत असल्याने कार्यकर्तेही युतीच्या घोषणेकडे लक्ष लावून आहेत. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित बॅनरही लावण्यात आला आहे. त्यामुळे ही केवळ राजकीय युती नसून कार्यकर्त्यांसाठी भावनिक क्षण असल्याचे दिसून येत आहे.