शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 00:49 IST2025-01-14T00:45:15+5:302025-01-14T00:49:02+5:30

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Shiv Sena to undergo organizational changes soon; Focus on strengthening party organization before local body elections | शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. यासंदर्भात आज सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या मुंबईतील खासदार, आमदार, नेते आणि उपनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकीपूर्वी संघटना मबजूत करण्याचे निर्देश शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.   

मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर आज पक्षाच्या मुंबईतील आजीमाजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भातील पक्षाच्या रणनितीबाबत चर्चा केली. पक्ष संघटना मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. 

येत्या २३ जानेवारी रोजी हिंदुह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे कुर्ला संकुलनात शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. यात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विजयी आमदार आणि खासदारांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, लवकरच पक्ष संघटनेत फेरबदल केले जातील. पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे काम केलं याचा आढावा घेऊन समिती पक्ष संघटेनतील नव्या नियुक्ती करेल. पक्षाकडून मुंबईत २४ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाईल. आतापर्यंत सगळ्यात मोठी सभासद नोंदणी असेल, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला. 

या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे, शिवसेना सोशल मिडिया राज्यप्रमुख राहुल कनाल, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार सदा सरवणकर, मीनाताई कांबळी, शीतल म्हात्रे आणि पक्षाचे सचिव उपस्थित होते. 

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा

शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले. लाचारी करुन काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघात शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. स्मारकाचा खर्च शासनाचा असून उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहेत. त्यामुळे त्यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन ताबडतोब हकालपट्टी व्हावी, ही आमची मागणी आहे. याबाबत आजच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल, असे कदम यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena to undergo organizational changes soon; Focus on strengthening party organization before local body elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.