शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:22 IST2025-12-17T11:21:21+5:302025-12-17T11:22:52+5:30
जेव्हा युतीच्या पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा त्याठिकाणी मुंबईतला मराठी माणूस ओसंडून वाहताना दिसेल असं संजय राऊत यांनी म्हटलं.

शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
मुंबई - शिंदेसेना अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. त्यांचा नैसर्गिक जन्म नाही. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातले आहे. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. त्यामुळे शिवतीर्थावर आम्ही सभा घेणार अशी गर्जना करू नका अशी बोचरी टीका खासदार संजय राऊतांनीएकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदेसेनेला आता बुडबुडे यायला लागलेत. यापूर्वी शिवतीर्थावर प्रचारसभा असेल किंवा सांगता सभा शिवसेनाच करत आली आहे. शिवतीर्थाशी शिंदेसेनेचा काय संबंध आहे? अमित शाहांनी तुम्हाला पक्ष दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध आहे असं नाही. भाजपाने शिवतीर्थावर कधी सभा घेतली आहे ते सांगावे. एकनाथ शिंदेंची ड्युप्लिकेट शिवसेना आहे, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजपा काम करायला तयार नाही. हे अमित शाहांनी लादलेले लग्न आहे. ते मनाने मोडले आहे. मात्र ही वधू शिंदे आहे तिला काही करून भाजपाच्या चरणाशी बसायचे आहे. त्यातून सगळा गोंधळ सुरू आहे. शिवतीर्थाशी संबंध हा ठाकरेंचा आहे. त्यामुळे आम्ही किंवा मनसेने केलेली मागणी ही नैतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या योग्य आहे असं त्यांनी सांगितले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान प्रचारसभेसाठी मिळावे असा अर्ज दोन्ही ठाकरे बंधूंसोबत भाजपा आणि शिंदेसेनेने केला आहे. त्यावर राऊतांनी हे भाष्य केले.
तसेच काँग्रेसला स्वबळ दाखवायचे आहे ते दाखवू द्या. आमची शरद पवारांसोबत चर्चा होईल. मुख्य पक्ष शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होत आहे. ही युती सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभे करत आहे. महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल. आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कित्येकदा एकत्र आलेत. एकमेकांशी चर्चा करत आहेत. एकमेकांच्या घरी गेलेत. जेव्हा युतीच्या पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा त्याठिकाणी मुंबईतला मराठी माणूस ओसंडून वाहताना दिसेल. अर्थात जागावाटप आणि युतीची घोषणा कशी करावी, पत्रकार परिषद घ्यावी की मेळावा घ्यावा यावर आज चर्चा होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसे यांच्यात जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मुंबई महत्त्वाची आहे. काल आमची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेला बहुतेक आज पूर्णविराम लागेल. काल संध्याकाळी मनसे नेते आणि शिवसेनेचे नेते अंतिम हात फिरवण्यासाठी बसले होते. मुंबईचा विषय आज संपेल. त्याशिवाय ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली, नाशिक इथेही चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. येत्या १-२ दिवसांत सगळं झाल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे युतीची घोषणा होऊ शकते. काहीही झालं तरी आमच्यात विसंवाद आणि गोंधळ नाही. महायुतीत जे चाललंय ते तसं आमच्यात नाही असा टोलाही संजय राऊतांनी महायुतीला लगावला.