काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याच्या हालचाली; संजय राऊत म्हणाले, “मविआत...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:14 IST2024-04-01T13:12:08+5:302024-04-01T13:14:12+5:30
Sanjay Raut News: दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेशी सहकार्य केल्याबाबत काँग्रेस हायकमांडचे आभार मानले, असे संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याच्या हालचाली; संजय राऊत म्हणाले, “मविआत...”
Sanjay Raut News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यानंतर वंचितच्या उमेदवारांची संख्या १९ वर पोहोचली आहे. वंचित सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही. एमआयएमसोबत न जाण्याचा पक्षाचा निर्णय होता. तो मी त्यांना कळविला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. अकोला लोकसभेच्या रिंगणात खुद्द प्रकाश आंबेडकर उतरले असून, काँग्रेस आता प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावर संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीतील नेते प्रकाश आंबेडकरांना सातत्याने सोबत येण्याची साद घालताना दिसत आहेत. असे असले तरी प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम असून, वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित महाविकास आघाडीत सामील होण्यासावरून आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. असे असले तरी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांची मदत करण्यासाठी काँग्रेस सरसावली असून, त्याबाबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. यावर मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी भाष्य केले.
महाविकास आघाडीत त्यावर चर्चा होऊ शकते
प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायचा की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. परंतु, महाविकास आघाडीत त्यावर चर्चा होऊ शकते, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे हायकमांड, मुकुल वासनिक, वेणुगोपाल आणि अन्य नेत्यांशी ओझरती भेट झाली. उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेशी सहकार्य केल्याबाबत त्यांचे आभार मानले. एवढेच सांगेन, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबत बोलताना, आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो. प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील, तर अकोला जागेसंदर्भात पुनर्विचार व्हावा, अशी आमच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही हायकमांडला कळवले आहे. त्यावर ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.