पश्चिम उपनगरातील ‘नाइट लाइफ’ तेजीत; अर्थचक्राला गती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:19 IST2026-05-19T10:19:13+5:302026-05-19T10:19:22+5:30
अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा भागात फिल्म, मीडिया आणि डिजिटल क्षेत्रातील तरुणांची मोठी वर्दळ असते. येथे रात्री उशिरापर्यंत डीजे पार्टी, थीम नाइट्स आणि लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असतात. त्यामुळे येथे रात्री १२ वाजेनंतरही वाहनांची वर्दळ असते.

पश्चिम उपनगरातील ‘नाइट लाइफ’ तेजीत; अर्थचक्राला गती
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम उपनगर दिवसापेक्षा आता रात्री उशिरापर्यंत अधिक जागे असल्याचे चित्र आहे. बांद्रा, अंधेरी, वर्सोवा, मालाड, कांदिवली ते बोरिवलीपर्यंत अनेक भागांमध्ये ‘नाइट लाइफ’ची संस्कृती झपाट्याने वाढत आहे. त्यातून रोजगार, पर्यटन आणि व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे, मात्र दुसरीकडे ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी, अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि सुरक्षेचे प्रश्नही गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा भागात फिल्म, मीडिया आणि डिजिटल क्षेत्रातील तरुणांची मोठी वर्दळ असते. येथे रात्री उशिरापर्यंत डीजे पार्टी, थीम नाइट्स आणि लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असतात. त्यामुळे येथे रात्री १२ वाजेनंतरही वाहनांची वर्दळ असते.
मोठ्या आवाजातील संगीतामुळे नागरिक त्रस्त
निवासी इमारतींजवळ सुरू असलेल्या उशिरापर्यंतच्या पार्ट्या, मोठ्या आवाजातील संगीत आणि वाहनांच्या हॉर्नमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी मद्यधुंद तरुणांकडून होणारे राडे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि बेकायदेशीर पार्किंगमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
पब संस्कृतीपेक्षा फूड जॉइंट्सवर गर्दी
मालाडमधील माइंडस्पेस परिसरात कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमुळे रात्रीचे खाद्यव्यवसाय तेजीत आले आहेत. तर बोरीवलीसारख्या पारंपरिक निवासी भागातही उशिरापर्यंत सुरू असलेल्या खाऊ गल्ल्या आणि कॅफेमुळे ‘नाइट इकॉनॉमी’ वाढत आहे.
बोरीवली आणि कांदिवली परिसरात पब संस्कृतीपेक्षा उशिरापर्यंत सुरू राहणारे फूड जॉइंट्स, फॅमिली हँगआऊट्स, कॅफे अधिक दिसतात. तरुणांसह कुटुंबीयही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरताना दिसतात. या नाइट लाइफमुळे हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रेस्टॉरंट, सुरक्षा, वाहतूक, ऑनलाइन डिलिव्हरी, इव्हेंट मॅनेजमेंट, मनोरंजन उद्योगांना मोठी चालना मिळते.