बिहार भवनाला मनसेचा विरोध; मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणार भव्य वास्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 08:22 IST2026-01-20T08:21:18+5:302026-01-20T08:22:16+5:30
जोपर्यंत मनसे आहे, तोपर्यंत बिहार भवन होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.

बिहार भवनाला मनसेचा विरोध; मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणार भव्य वास्तू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर बिहार भवन बांधण्यासाठी नितीश कुमार सरकारने परवानगी दिली आहे. त्याला मनसेने विरोध दर्शविला आहे. जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत बिहार भवन होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी नेते आणि नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीमध्ये पालिकेच्या गटनेतेपदी किल्लेदार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. दुसरीकडे, उद्धवसेनेच्या गटनेतेपदासाठी मात्र चुरस निर्माण झाली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. यानंतर किल्लेदार यांनी पत्रकारांशी बोलताना नगरसेवकांच्या बैठकीत पालिकेतील गटनेता म्हणून निवड झाल्याची माहिती दिली. पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र घेतले नाही. पक्षाला तशी गरज वाटली नाही. निवडून आलेले नगरसेवक कट्टर आहेत. ते भीक घालणार नाहीत, असेही किल्लेदार म्हणाले.
दुसरीकडे, उद्धवसेनेमध्ये गटनेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अनुभवी नगरसेवकाची आवश्यकता आहे. त्यामुळे माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे, रमाकांत रहाटे यांची नावे चर्चेत आहेत.