शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 07:58 IST2026-05-01T07:57:55+5:302026-05-01T07:58:45+5:30
शुक्रवारी रात्री ११:५१ वाजता सुटणारी सीएसएमटी–बदलापूर लोकल ही ब्लॉकपूर्वीची शेवटची फेरी असेल, तर शनिवारी पहाटे ३:३५ वाजता कर्जतहून सुटणारी सीएसएमटीकडे जाणारी लोकल ही ब्लॉकनंतरची पहिली फेरी असेल

शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
मुंबई : मध्य रेल्वेकडून कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेवरील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) कामासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण-बदलापूरदरम्यान उपनगरी लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
शनिवारी मध्यरात्री १:४० ते पहाटे ३:४० या वेळेत कल्याण ते अंबरनाथदरम्यान अप व डाउन मार्गांवर पहिला ब्लॉक घेण्यात येईल. त्यानंतर रविवारी मध्यरात्री १:३० ते पहाटे ३:३० या वेळेत अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान डाउन मार्गावर दुसरा ब्लॉक असेल. या दोन्ही ब्लॉकदरम्यान संबंधित मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. शुक्रवारी रात्री ११:५१ वाजता सुटणारी सीएसएमटी–बदलापूर लोकल ही ब्लॉकपूर्वीची शेवटची फेरी असेल, तर शनिवारी पहाटे ३:३५ वाजता कर्जतहून सुटणारी सीएसएमटीकडे जाणारी लोकल ही ब्लॉकनंतरची पहिली फेरी असेल. तसेच शनिवारी रात्री ११:३० वाजताची सीएसएमटी–कर्जत लोकल ही शेवटची फेरी ठरेल, तर रविवारी पहाटे ३:३५ वाजताची कर्जत–सीएसएमटी लोकल ही पहिली फेरी असेल.
मेल-एक्स्प्रेसना फटका
मेगाब्लॉकमुळे काही लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. कोणार्क एक्स्प्रेस, विशाखापट्टणम–एलटीटी एक्स्प्रेस आणि हुसैनसागर एक्स्प्रेस या गाड्या कर्जत–पनवेल मार्गे वळविण्यात येतील. कल्याण स्थानकावर थांबा असलेल्या या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे येथे अतिरिक्त थांबा दिला जाणार आहे. उशिराने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक परिचालनानुसार बदलले जाऊ शकते. तांत्रिक देखभालीच्या कामामुळे रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन प्रणाली (पीआरएस) १ मे रोजी रात्री ११:४५ ते २ मे रोजी पहाटे ४:४५ या वेळेत बंद राहणार आहे.