Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:29 IST2025-09-01T14:57:26+5:302025-09-01T16:29:21+5:30
Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: २९ ऑगस्ट रोजी मुंबईत सुरू झालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: २९ ऑगस्ट रोजी मुंबईत सुरू झालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाची धार तीव्र झालेली पाहायला मिळत आहे. हजारो मराठा आंदोलकांमुळे सीएसएमटीसह अनेक भागातील रस्ते ठप्प झाले. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली. मुंबईकर, प्रवासी, नोकरदारांना यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठकही घेतली. पाहा, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे Live Updates...
LIVE
01 Sep, 25 : 04:26 PM
मुंबईकरांना त्रास होईल असे काहीही करू नये: हायकोर्ट
मनोज जरांगे पाटील यांना पाच हजार आंदोलकांसह एक दिवस आंदोलन करण्याची परवाणगी देण्यात आली होती. तरीही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे कोर्टाच्या आधीच्या आदेशाचे उल्लंघन झाले. मुंबईकरांना त्रास होईल असे काहीही करू नये, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
01 Sep, 25 : 04:25 PM
उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना हटवा; मराठा आंदोलनाप्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तर, त्यांना तत्काळ उपचार देण्यात यावे. मुंबईत ज्या ठिकाणी रस्ते आडवण्यात आले आहेत, त्या ठिकाणाहून उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना हटवावे. आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले.
01 Sep, 25 : 04:16 PM
मी एकही गोष्ट सोडणार नाही: मनोज जरांगे पाटील
सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट लागू करायलाच हवेत. बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या वारसाला नोकरी आणि आर्थिक मदत हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे तो जीआर मला पाहिजे. मी एकही गोष्ट सोडणार नाही. सरकारने मागण्यांवर बारकाईने पाहिले पाहिजे. सगेसोयरेबाबत अधिसूचना काढणार होते, त्याचे काय झाले तेदेखील कळायला हवे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
01 Sep, 25 : 04:15 PM
नरेंद्र मोदी, अमित शाह यांना डाग लागू शकतो: मनोज जरांगे पाटील
प्रत्येकवेळी तुम्ही बांधलेले अंदाज चुकत आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात कधीही विचार करू नका. मी विचित्र रसायन आहे. माझा समाज मला आयुष्यात कधीही सोडू शकत नाही, त्यासाठी तो पक्षाला लाथ मारू शकतो. एवढा समाज माझ्यावर प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळे देशाला डाग लागू शकतो. तुमच्या आडमुठेपणा, बालिशपणामुळे आणि द्वेषाने भरलेल्या बुद्धीमुळे देशाला डाग लागू शकतो. नरेंद्र मोदी, अमित शाह यांना डाग लागू शकतो, तो लागू देऊ नका कारण पुढचा काळ अवघड होईल, असा इशाराही जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
01 Sep, 25 : 04:15 PM
जातीयवादी असणाऱ्यांना पहिले इथून काढून टाका: मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सांगतो की, तुमचा एक डीसीपी आहे तो दंगल पेटावी म्हणून आंदोलकांच्या कॉलर धरतोय. पोरांना कॉलर धरल्यावर, ढकलून दिल्यावर राग येतो. उगाच असले प्रकार करू नका. लई पश्चाताप होईल. तो जो कुणी डीसीपी असेल त्याला सांगा. आमच्या जालना येथून पोलीस अधिकारी आलेत, त्यांना पुन्हा गावाला पाठवून द्या. जातीयवादी असणाऱ्यांना पहिले इथून काढून टाका, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
01 Sep, 25 : 04:13 PM
काही जातीयवादी पोलीस मराठा पोरांना उसकावून आरक्षण असे मिळणार नाही, तुम्ही उड्या हाणा... काही पोलीस गाड्या अडवा, मग आरक्षण मिळेल असं पोरांना सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सांगून पोलीस वाहने अडवत आहेत, काही रुमाल बांधत आहेत असले प्रकार घडत आहे. त्यामुळे माझ्या एकाही पोराला लागले तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ देणार नाही. एकाही पोराला काठी लागली तर मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा कधी सुरू होऊ देणार नाही असे त्यांनी म्हटले.
01 Sep, 25 : 04:13 PM
आंदोलनाच्या एक महिना आधी मी सांगितले होते, देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतोय. त्यांचे काही लोक आमच्यात घुसवून ते हुल्लडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकांवर खापर फोडणार. ते आमचे कार्यकर्ते नाहीत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
01 Sep, 25 : 04:12 PM
माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही. माझ्या पोरांची काही चूक नाही. आम्ही २ वर्षापासून आरक्षण मागत आहोत. माझ्या जातीची काही चूक नाही. माझ्या जातीला तुम्ही इतके वेड्यात काढता का? आमचे आरक्षण असूनही दिले जात नाही, असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
01 Sep, 25 : 04:11 PM
मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे. आणखीन वेळ आहे. त्याआधीच तुम्ही निर्णय घ्या. ते जर मुंबईत आले तर कुठेच उभा राहण्यासाठी जागा राहणार नाही. कारण ती मोठ्या संख्या येणार आहे. म्हणून मी म्हणतोय तुम्ही गाफील राहू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
01 Sep, 25 : 04:10 PM
गोळ्या जरी घातल्या तरीही मी आझाद मैदानावरुन उठणार नाही: मनोज जरांगे पाटील
आम्ही कायदा सोडून कुठेही काहीही केलेले नाही. आम्ही चार महिन्यांपूर्वी सरकारला निवेदन दिले आहे, सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. याचिकाकर्ते सरकारवर का बोलत नाहीत. सरकारमुळे मुंबईची शांतता बिघडली असे याचिकाकर्ते का म्हणत नाहीत, असा सवाल जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या जरी घातल्या तरीही मी आझाद मैदानावरुन उठणार नाही. निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
01 Sep, 25 : 04:02 PM
विविध वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांची मुंबई हायकोर्टाने घेतली दखल
विविध वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली. २६ ऑगस्टचा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तुम्ही पालन करणार का, तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढणार का की, ५००० वरच्या लोकांनी परत जावे, हायकोर्टाची आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना विचारणा.
01 Sep, 25 : 03:59 PM
मनोज जरांगे यांना नोटीस बजावली होती, पण त्यांनी स्वीकारली नाही
मनोज जरांगे यांना नोटीस बजावली होती. परंतु, त्यांनी ती स्वीकारली नाही. यासंदर्भात व्हिडिओही आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
01 Sep, 25 : 03:58 PM
आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये: मुंबई हायकोर्ट
आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये. पाच हजारांपेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी होती. पहिल्या दिवशीच ६ नंतर मैदान खाली करणे आवश्यक होते, अशी अनेक निरीक्षणे नोंदवत हायकोर्टाने आयोजकांना फटकारले आहे.
01 Sep, 25 : 03:56 PM
CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा
मुंबईतील CSMT, मरिन ड्राइव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. उद्या ७ दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होते, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.
01 Sep, 25 : 03:55 PM
हे प्लॅन करून झाले, आंदोलनकर्ते ऐन गणपतीत आले
नियमाला अधीन राहून परवानगी देण्यात आली होती आणि नियमांच्या अधीन राहून आंदोलन करण्याचे मान्य करण्यात आले होते. हे प्लॅन करून झाले आहे, आंदोलनकर्ते ऐन गणपतीत आले आहेत. आंदोलनकर्त्यांनी नियमांचे पालन केले पाहिजे; उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत राज्य सरकारची मागणी
01 Sep, 25 : 03:50 PM
आगामी निवडणुकांमुळे राज्य सरकार काही करू शकत नाही - गुणरत्न सदावर्ते
आरक्षण राजकारणामुळे हे सगळे सुरू आहे. आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप आहे. आंदोलनकर्त्यांना ट्रकने सगळे पुरवले जात आहे. आंदोलनकर्ते शिवीगाळ करत आहेत. महिला पत्रकार वार्तांकन करू शकत नाही. आसपासच्या रुग्णालयात कोणी जाऊ शकत नाही. शाहीन बाग आंदोलनानुसार याची चौकशी व्हावी. आगामी निवडणुकांमुळे राज्य सरकार काही करू शकत नाही. सगळ्या मराठा संघटनांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे.
01 Sep, 25 : 03:47 PM
मराठा आंदोलकांचा मुक्काम वाढणार? मजबूत मंडप बांधायचं काम सुरू
01 Sep, 25 : 03:46 PM
अजून आंदोलनकर्ते मुंबईत येत आहेत, त्यांना कसे अडवणार: हायकोर्ट
पूर्ण हायकोर्टाला घेराव घालण्यात आला आहे. हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची वाहने अडवण्यात आली. त्यांना हायकोर्टात येण्यापासून अडवण्यात आले. न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आले. अजून आंदोलनकर्ते मुंबईत येत आहेत, त्यांना कसे अडवणार, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने सरकारला केली.
01 Sep, 25 : 03:43 PM
मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या वकिलांकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या वकिलांकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न. आरक्षण देण्यात आले असल्याचे हायकोर्टाने केले स्पष्ट. तसेच तुम्हाला ते आरक्षण हवे आहे की नाही, हायकोर्टाने केली विचारणा.
01 Sep, 25 : 03:42 PM
राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू आहे: गुणरत्न सदावर्ते
मी २९ तारखेला तक्रार दिली. आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली. लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला पण पोलिसांनी कारवाई केली नाही. राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर घोषणाबाजी सुरू आहे. महिला पत्रकारांना त्रास दिला जात आहे, असे अनेक मुद्दे मांडत आणि परिस्थितीचे गांभीर्य गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
01 Sep, 25 : 03:39 PM
मनोज जरांगे यांचे आंदोलन हाताबाहेर गेले आहे. मुंबई थांबवू शकत नाही: हायकोर्ट
तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही. रस्ते अडवू शकत नाही. मुंबईची दिनचर्या थांबवू शकत नाही आणि हेच सगळे सुरू आहे. आंदोलन हाताबाहेर गेल आहे. कोर्टाच्या निर्देशांचे पालन होईल या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलावीत; हायकोर्टाचे निर्देश
01 Sep, 25 : 03:31 PM
ब्रेबॉन स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम येथे जगा द्यावी
५००० पेक्षा लोक खूप जास्त आहेत. आम्ही सोशल मीडियावर त्यासंदर्भातील मेसेज प्रसारित करू जेणेकरून कोणी रस्त्यावर बाहेर फिरणार नाही. ब्रेबॉन स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम वर जगा द्यावी आणि त्यांना बाहेर न पडण्याचे निर्देश द्यावेत, आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची हायकोर्टात मागणी.
01 Sep, 25 : 03:30 PM
मनोज जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढू
राज्य सरकारने जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. रस्त्यावरचे दिवे तीन तास बंद करण्यात आले होते. खाद्याची दुकान बंद होती. सार्वजनिक शौचालय बंद होती. मी स्वतः जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढू, वकील पिंगळे यांची हायकोर्टात माहिती
01 Sep, 25 : 03:27 PM
मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टात उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी घेण्यात आली. राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंदोलनाच्या बाजूने असणाऱ्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर हायकोर्टाने उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा एकदा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
01 Sep, 25 : 03:24 PM
आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत: हायकोर्टाला विनंती
आंदोलन थांबवण्याच निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती सरकारकडून हायकोर्टाला करण्यात आली.
01 Sep, 25 : 03:23 PM
मराठा आंदोलकांमुळे मुंबई ठप्प, सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलक चढला थेट खांबावर
01 Sep, 25 : 03:22 PM
मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले, आता मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका
मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले आहे. आता मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका. दोन दिवसांत सर्व पूर्ववत करा. मुंबईत कोणाला येऊ देऊ नका. ठाण्यातच रोखा; हायकोर्टाचे निर्देश
01 Sep, 25 : 03:16 PM
कोर्टाच्या निर्देशांचे पालन व्हायला हवे, आंदोलकांवर मनोज जरांगे यांचे नियंत्रण नाही; हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण
01 Sep, 25 : 03:15 PM
लोकलच्या केबिनमध्ये मराठा आंदोलक घुसले…पोस्टर लावले काय झालं पाहा
01 Sep, 25 : 03:14 PM
सरकारकडून हायकोर्टात युक्तिवाद
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघणार नाही. केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांनी अटी शर्ती पळून परवानगी मागितली होती म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती. तुम्ही सगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याच वेळीवेळी राज्य सरकारने जरांगे पाटील यांना सांगितले; सरकारकडून हायकोर्टात युक्तिवाद
01 Sep, 25 : 03:11 PM
केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे. मात्र दुसरीकडे आंदोलन करण्यास परवानगी नाही. परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती; राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात माहिती
01 Sep, 25 : 03:10 PM
मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे का, मुंबई हायकोर्टाची विचारणा
01 Sep, 25 : 03:08 PM
संपूर्ण दक्षिण मुंबई आणि परिसरात रास्तारोको केला जात आहे. सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास होत आहे. महाधिवक्ता बीरेंद्र सराफ युक्तिवाद करत आहेत. हायकोर्टात अनेक याचिका आंदोलनविरोधात दाखल आहेत.
01 Sep, 25 : 03:06 PM
शनिवार-रविवारचे आंदोलन विनापरवानगी: महाधिवक्ता
शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच आंदोलन परवानगीविना होते. ध्वनिक्षेपकाचा वापर विनापरवानगी केला. अटी-शर्थीच्या उल्लंघनाची माहिती महाधिवक्त्यांकडून हायकोर्टात दिली.
01 Sep, 25 : 03:02 PM
Mumbai High Court: सुट्टी असूनही मुंबई उच्च न्यायालयात मनोज जरांगे यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाला सुट्टी असूनही या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. न्या. गौतम अंखड, न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते, राज्याच्या महाधिवक्त्यांकडून युक्तिवाद सुरू आहे.
01 Sep, 25 : 03:02 PM
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी
आझाद मैदानाजवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्टेशनवरील आंदोलकांनी याठिकाणी घोषणाबाजी सुरू केली. त्याशिवाय काही आंदोलकांनी लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसल्याचा प्रकार घडला आहे.
01 Sep, 25 : 03:02 PM
आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस. यावेळी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची आमदार अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली.
01 Sep, 25 : 03:01 PM
वाशी रेल्वे स्थानाकावर मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी
वाशी रेल्वे स्थानकावर आंदोलक रेल्वे रूळ ओलांडत आहेत. पोलीसांनी वारंवार आवाहन करूनही मराठा आंदोलक जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवर हुल्लडबाजी सुरू आहे. काही हुल्लडबाजांमुळे आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता. पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आंदोलकांना आवाहन.