Join us

राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 10:09 IST

Worli Vidhan Sabha Election 2024: मतदारसंघात खोटा प्रचार केला जातोय. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका असं आवाहन उमेदवार संदीप देशपांडे यांनी जनतेला केले आहे.

मुंबई - वरळी मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून यात मनसेकडून संदीप देशपांडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि उद्धवसेनेकडून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज मतदानाचा दिवस उजडला आहे. मात्र वरळीत एक गंभीर प्रकार समोर आला आहे. शिंदेच्या शिवसेना शाखाप्रमुखाकडून राज ठाकरे यांच्या बनावट सहीचं पत्र व्हायरल केले जात आहे असा आरोप करत मनसेने पोलीस स्टेशन आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मनसेचा शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा खोटा दावा मतदारसंघात पसरवला जात आहे. 

याबाबत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेनेचे शिंदे गटाचे शाखाप्रमुख राजेश कुसळे हे खोटा प्रचार करत आहेत. मनसेकडून शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे हरणार आहेत त्यामुळे अशाप्रकारे खोटा प्रचार केला जातोय. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाविरोधात आम्ही तातडीने पोलीस स्टेशनला आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे अशी माहितीही उमेदवार संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

वरळीत तिरंगी लढत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी हा चर्चेतला मतदारसंघ आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा विजय एकतर्फी होता. त्यांच्याविरोधात तुल्यबल उमेदवार नसल्याने आदित्य भरघोस मतांनी विजयी झाले. परंतु यंदा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे यांनी आव्हान निर्माण केले आहे. त्याशिवाय शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात मिलिंद देवरा हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यावेळी आदित्य ठाकरे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराला ६ हजारांचे लीड मिळाले आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४वरळीमुंबई विधानसभा निवडणूकसंदीप देशपांडेमनसेएकनाथ शिंदेआदित्य ठाकरे