‘लोकमत उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे परळमधील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 06:23 IST2026-04-30T06:22:39+5:302026-04-30T06:23:06+5:30
आज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य ‘लोकमत’ सातत्याने करत आहे

‘लोकमत उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे परळमधील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये आयोजन
मुंबई - लोकमत समूहातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘लोकमत उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ हा प्रतिष्ठेचा सोहळा गुरुवार, ३० एप्रिल रोजी परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल (आयटीसी ग्रँड मराठा) या ठिकाणी दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यात उद्योजक, शैक्षणिक, वैद्यकीय, किरकोळ व्यापार तसेच समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्य, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास आणि मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त संजय मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी असोसिएट पार्टनर म्हणून ‘आय लव्ह मुंबई फाउंडेशन’चे राहुल कनाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
‘लोकमत’ हे केवळ एक वृत्तपत्र नसून, समाजाच्या प्रगतीचा साक्षीदार आणि एक प्रेरणादायी प्रवाह आहे. समाजातील प्रगतिशील व्यक्तींना मोठे व्यासपीठ देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा ‘लोकमत’ने गेली अनेक वर्षे जोपासली आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य ‘लोकमत’ सातत्याने करत आहे. त्यामुळे सर्वार्थाने हा सोहळा समाजातील उत्तम कार्याचा गौरव करणारा व प्रेरणादायी ठरणारा भव्य उत्सवच ठरणार आहे.