कबुतरखान्यांच्या ‘त्या’ चार जागांना स्थानिकांचा विरोध; पालिकेचा निर्णय मागे घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:52 IST2025-11-03T11:51:12+5:302025-11-03T11:52:09+5:30
स्थानिकांचे मत विचारात न घेता घेतलेला निर्णय असल्याचा आरोप

कबुतरखान्यांच्या ‘त्या’ चार जागांना स्थानिकांचा विरोध; पालिकेचा निर्णय मागे घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महानगरपालिकेकडून कबुतरांना दाणे टाकण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून वरळी जलाशय परिसर, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड जवळचा खारफुटी परिसर आणि जुना ऐरोली-मुलुंड जकात नाका, तसेच बोरिवली पश्चिम येथील गोराई मैदान या चार ठिकाणांची निवड केली. मात्र, अंधेरी, मुलुंड, बोरिवली भागातील स्थानिक नागरिकांकडून मात्र पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध होत असून, पालिकेने आपला निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
ऐरोली - मुलुंड लिंक रोड हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. त्यामुळे येथे कबुतरांचे थवे आणि दाणे टाकणारे नागरिक यांमुळे दुचाकीस्वारांसाठी, अपघाताचा धोका वाढेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी मांडले आहे. येथील कबुतरखान्याबाबत हरकत नोंदवणारे पत्र देवरे यांनी पालिकेला पाठवण्यात आल्याचेही देवरे म्हणाले.
विभिन्न प्रजातीचे पक्षी दूर जाण्याची भीती
खारफुटी असलेल्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात विभिन्न प्रजातीच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. कबुतरखान्यामुळे या प्रजाती दूर जातील, अशी भीती लोखंडवाला ओशिवरा रेसिडेन्शिअल असोसिएशनने व्यक्त केली. स्थानिकांशी यावर चर्चा करून, शहराबाहेर जागेची निवड करणे आवश्यक होते, असे मत लोका संघटनेचे सदस्य धवल शाह यांनी व्यक्त केले.
भविष्यात जागांमध्ये वाढ?
मराठी एकीकरण समितीने पालिकेच्या निर्णयाचा विरोध केला असून, भविष्यात या जागांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी यावर हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन समितीने केले आहे.
- सकाळी ७:०० ते ९:०० यावेळेत कबुतरांना दाणे टाकता येणार.
- सध्या बंद असलेले कबुतरखाने बंदर राहाणार.
- स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तरच नवीन जागांसाठी परवानगी.
- ९ हजार ७७९ सूचना आणि हरकती नवीन जागांबाबत पालिकेला प्राप्त.
- स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावणे, वाहने व पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये, याची दक्षता घ्यावी लागणार.
- कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) असतील.