वाढदिवसाच्या पार्टीवेळी एसी बंद ठेवणे पडले महागात; लोअर परळच्या हॉटेलला भरपाई देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:02 IST2026-04-29T12:02:39+5:302026-04-29T12:02:53+5:30
रेस्टॉरंटला आदेशाची प्रत मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयोगाने दिले.

वाढदिवसाच्या पार्टीवेळी एसी बंद ठेवणे पडले महागात; लोअर परळच्या हॉटेलला भरपाई देण्याचे आदेश
मुंबई - वाढदिवसाच्या पार्टीत एसी बंद पडल्याने पाहुण्यांना गुदमरल्यासारखे झाले. एसी हा कार्यक्रमस्थळाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने लोअर परळ येथील एका रेस्टॉरंटला ग्राहकाला भरपाईचे आदेश दिले.
रेस्टॉरंटच्या सेवेत त्रुटी आढळल्याने ग्राहकाला २२,५५७ रुपये भरपाई देण्यास आयोगाने सांगितले. तसेच या रकमेवर ऑगस्ट २०२४ पासून वार्षिक ६ टक्के व्याजाने देण्याचे निर्देश दिले. मानसिक त्रासासाठी १० हजार रुपये आणि कायदेशीर खर्चासाठी पाच हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. घाटकोपर येथील तक्रारदार महिलेने जुलै २०२४ मध्ये लोअर परळ येथील रेस्टॉरंटमधील बँक्वेट हॉल नातेवाईकाच्या वाढदिवसासाठी बुक केला होता. यासाठी तिने एकूण ३.६३ लाख रुपये दिले होते. या महिलेच्या तक्रारीनुसार, कार्यक्रमादरम्यान एसी बंद पडला. त्यामुळे पाहुण्यांना गुदमरल्यासारखे वाटले आणि मोठा त्रास सहन करावा लागला.
४५ दिवसांची मुदत
आयोगाचे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौर कापसे यांनी नमूद केले की, अन्न किंवा इतर सेवांमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही. मात्र, कौटुंबिक कार्यक्रमासाठी बँक्वेट हॉल बुक करताना एअर कंडिशनिंग हा एक अत्यावश्यक घटक असतो. एसीसाठी वेगळे शुल्क आकारले नसले तरी एकूण रक्कम ही सर्व सेवांसाठी एकत्रित स्वरूपात घेतली जाते, त्यात एसीचाही समावेश असतो, असे आयोगाने म्हटले. रेस्टॉरंटला आदेशाची प्रत मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयोगाने दिले.
तात्पुरती व्यवस्था अपुरी
व्यवस्थापनाने पंखे लावून तात्पुरती व्यवस्था केली, पण ती अपुरी ठरली. अनेक पाहुणे जेवण न करता निघून गेले, त्यामुळे लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली. कार्यक्रमापूर्वी काही दिवसांपासून एसी बिघडलेला होता आणि तो दुरुस्त करण्यात आलेला नव्हता, अशी कबुलीही कर्मचाऱ्यांनी दिली होती. याबाबत नोटीस बजावूनही रेस्टॉरंट व्यवस्थापन आयोगासमोर हजर न राहिल्याने हे प्रकरण एकतर्फी चालवण्यात आले.