कांदिवलीत सराफाची हत्या करून चोरी

By Admin | Updated: November 21, 2014 01:11 IST2014-11-21T01:11:24+5:302014-11-21T01:11:24+5:30

सराफाची गळा चिरून हत्या केल्यानंतर ज्वेलरी दुकानातील सुमारे बारा लाखांचे दागदागिने दोन आरोपींनी चोरून पोबारा केला

Kandivli stealing the bullfold by stealing | कांदिवलीत सराफाची हत्या करून चोरी

कांदिवलीत सराफाची हत्या करून चोरी

मुंबई : सराफाची गळा चिरून हत्या केल्यानंतर ज्वेलरी दुकानातील सुमारे बारा लाखांचे दागदागिने दोन आरोपींनी चोरून पोबारा केला. ही घटना काल दुपारी कांदिवली पश्चिमेकडील शिवशक्ती कम्पाऊंडमधील माँ ज्वेलर्समध्ये घडली.
चंद्रप्रकाश सेवय (२२) असे हत्या झालेल्या सराफाचे नाव आहे. चंद्रप्रकाश याच्या माँ ज्वेलर्समध्ये दुरूस्तीचे काम सुरू होते. एक प्लंबर आणि इलेक्ट्रीशीअन मंगळवारपासून या दुकानात काम करत होते. बुधवारी ते अपुरे काम पूर्ण करण्यासाठी आले. दुपारी चंद्रप्रकाशसोबत त्यांनी जेवणही केले. जेवणाचा डबा चंद्रप्रकाशचा भाऊ राजेंद्र याने दुकानात आणला होता. डबा देऊन तो तेथून निघून गेल्यानंतर प्लंबर व इलेक्ट्रीशीअनने चंद्रप्रकाशच्या गळयावर सुरी फिरवली. त्यानंतर दुकानातील सुमारे ११ लाख ७२ हजारांचे दागदागिने चोरले आणि पळ काढला.
रात्र झाली तरी चंद्रप्रकाश घरी पोहोचला नाही हे पाहून राजेंद्र त्याची खुशाली जाणून घेण्यासाठी दुकानावर गेला. तेव्हा चंद्रप्रकाश रक्ताच्या थारोळयात दुकानात आढळला. पुढे कांदिवली पोलीस घटनास्थळी धडकले. मृतदेह शवविच्छदनासाठी धाडला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या कांदिवली युनीटनेही समांतर तपास सुरू केल्याची माहिती मिळते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी सेवय कुटुुंबाच्या चांगल्या परिचयातील होते. त्यामुळे त्यांच्याबाबतची बरीचशी माहिती कांदिवली पोलिसांनी मिळवून तपासाची दिशा निश्चित केली आहे.

Web Title: Kandivli stealing the bullfold by stealing