नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 18:32 IST2020-09-09T18:32:10+5:302020-09-09T18:32:37+5:30
पडझड सुरुच; झाड कोसळून महिला जखमी

नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण
मुंबई : मुंबईतपाऊस ब-यापैकी गायब झाला असून, दुपारी पडणारे रखरखीत ऊनं मुंबईकरांना चटके देत आहे. यात भर म्हणून की काय दररोज सायंकाळी दाटून येणा-या ढगांचा केवळ गडगडाट होत असून, पाठ फिरवलेल्या पावसानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईकर अक्षरश: ऊकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माहीममध्ये झाड कोसळून एक महिला जखमी झाली. कुरेशी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करत त्यांना सोडण्यात आले.
मागील आठवड्याभरापासून मुंबईच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, सायंकाळीसह रात्री मुंबईच्या आकाशात ढगांचा गडगडाट होत आहे. कुठे तरी पडणारी एखादी सर वगळता पाऊस गायबच आहे. उलटपक्षी दिवसभर दाटून येणारे ढग आणि रखरखीत ऊनं असेच काहीसे वातावरण मुंबईत आहे. बुधवारी देखील मुंबईत शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी पडझडीच्या घटना घडतच आहेत. ३ ठिकाणी झाडे कोसळली. ३ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. दरम्यान, गुरुवारीदेखील मुंबई ढगाळ राहील. आकाश साधारणत: ढगाळ राहील. गडगडाटासह पावसाच्या हलक्या किंवा मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.