इमारतींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; पुन्हा दुरुस्तीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:41 IST2019-05-30T01:41:50+5:302019-05-30T01:41:54+5:30

चेंबूरमधील मुकुंदनगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या १३ इमारती आहेत. परंतु या इमारतींच्या सुरक्षेकडे पालिकेने लक्ष न दिल्यामुळे आता पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे.

Ignoring the safety of buildings; Repeat Time | इमारतींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; पुन्हा दुरुस्तीची वेळ

इमारतींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; पुन्हा दुरुस्तीची वेळ

मुंबई : चेंबूरमधील मुकुंदनगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या १३ इमारती आहेत. परंतु या इमारतींच्या सुरक्षेकडे पालिकेने लक्ष न दिल्यामुळे आता पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. मुकुंदनगर शिवशक्तीनगर परिसरात १२ वर्षांपूर्वी इमारती बांधण्यात आल्या आहेत. इमारती प्रकल्पबाधितांसाठी पालिकेला हस्तांतरित करण्यात आल्या. मात्र, या इमारतींच्या सुरक्षेकडे मुंबई महापालिकेने लक्ष दिले नाही. त्यामुळे या इमारतींची दुरवस्था झाली झाली आहे. काही समाजकंटकांनी इमारतीतील घरांचे दरवाजे, खिडक्या तोडल्या आहेत. शौचालयाची तोडफोड केली आहे. घरामध्ये बाटल्यांचा खच पडला आहे. मीटरबॉक्सही काढले आहेत. पाण्याची पाइपलाइन, लाइटची फिटिंग तोडण्यात आली आहे.
प्रकल्पबधितांसाठी घरांची आवश्यकता असल्याने, या दुरवस्था झालेल्या १३ इमारतींच्या दुरुस्तीचाही निर्णय घेण्यात आला. तळ अधिक चार मजली असलेल्या या इमारतींच्या दुरुस्तीचे कंत्राट मेसर्स उमित कॉर्पोरेशन या कंपनीला देण्यात आले आहे. एकूण १८ हजार ४०६ चौरस मीटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी प्रति चौरस मीटरकरिता ३ हजार ६०६ रुपये एवढा खर्च करण्यात आहे.
या इमारतीच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे पालिकेला हा भुर्दंड बसला आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी दोन दिवसांपासून एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तो होऊ शकला नाही.
>आम्हाला गोल्फ क्लब येथून स्थलांतरित करण्यात आले आहे. आम्ही येथे राहायला आलो, तेव्हा या इमारतीची दुरवस्था होती. काही जणांनी स्वखर्चान दुरुस्ती केली. ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, त्यांनी दुरुस्ती केली नाही. पालिकेने या घरांची दुरुस्ती करायला हवी.
- लता साळवे, रहिवासी

गेल्या काही वर्षांपासून एका कंपनीला या इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी कंपनीला पैसे देण्यात येत होते. मात्र, सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे काही समाजकंटकांनी या इमारतींमध्ये तोडफोड केली. आता पालिकेला याची दुरुस्ती करावी लागत आहे़ गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने येथे दुरुस्तीची कामे सुरू केल्यापासून आता पाच ते सहा सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
- पंढरीनाथ सुरवसे, रहिवासी

Web Title: Ignoring the safety of buildings; Repeat Time