"उद्धवला फोन केला आणि म्हणालो, माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय?", राज ठाकरेंच्या विधानावर सगळेच लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 00:30 IST2026-01-24T00:28:30+5:302026-01-24T00:30:13+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मिश्कील विधानावर सगळेच खळखळून हसले.

"उद्धवला फोन केला आणि म्हणालो, माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय?", राज ठाकरेंच्या विधानावर सगळेच लोटपोट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्यांच आजार आणि डॉक्टरांचा किस्सा ऐकवत खळखळून हसवले. मी कालच उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, बरं नसल्याने मला फार बोलता येणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या औषधांचा गुणच येत नसल्याचे सांगितले. माझ्या डॉक्टरने उद्धव ठाकरेंना औषधे दिली, तर दोन दिवसात बरे झाले. मला अजूनही फरक पडेना, असे राज ठाकरे म्हणाले.
कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले, "निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते. सर्दी खोकला वगैरे. मी ताणून धरलं होतं. मग मला सर्दी-खोकला-ताप सुरू झाला. अजून ते चालूच आहे. मी कालपण त्यांना म्हटलं होतं की मला फार बोलता येणार नाही. कारण शब्दांवरचे अनु्स्वार सर्दीमुळे गेलेत.
डॉक्टरने पक्ष बदलला की काय?
"माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉ्क्टर यादव म्हणून... मराठी यादव हा. मी त्यांच्याकडून औषधं घेतली आणि उद्धवंना दिली. दोन दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडून सहा दिवस झाले अजून काही नाही. मी परवा दिवशी याला (उद्धव ठाकरे) फोन केला आणि म्हटलं माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय? च्यायला", असे राज ठाकरेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
'आज बाळासाहेब व्यथित झाले असते'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या विचारांबद्दल भाष्य केले. "त्यावेळचे वातावरण वेगळे होते. त्यावेळचे वातावरण हे तयार केलेले नव्हते. ते तयार झालेले वातावरण होते. त्या वातावरणामध्ये बाळासाहेबांनी तो विचार जेव्हा देशामध्ये फुंकला. त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं. आज जर बाळासाहेब असते, तो जो हिंदुत्वाचा सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवला आहे. तो पाहिला असता तर निश्चित व्यथित झाले असते", अशी खंत राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना व्यक्त केली.
'हिंदुत्व दुसऱ्याचे वाभाडे काढण्यासाठी जागृत केले नाही'
राज ठाकरे म्हणाले, "बाळासाहेबांनी ज्या तडफेने, निष्ठेने ते विचार मांडले. खासकरून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलचे मांडले. हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले, दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी केले. मला असं वाटतं की, तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू. अशी मला एक आशा, अपेक्षा आहे", अशा भावना राज ठाकरेंनी यावेळी मांडले.