किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते

By यदू जोशी | Published: April 10, 2024 11:58 AM2024-04-10T11:58:34+5:302024-04-10T11:59:06+5:30

दिल्लीतील आपल्या घरी ते कपडे धूत असताना काही सनदी अधिकारी आणि काही नेते अचानक आले.

He was washing his own clothes when the ministry came | किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते

किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते

यदु जोशी

बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवते या दोन्ही नेत्यांना कोकणचे सुपुत्र म्हणतात पण दोघेही कोकणचे मूळ रहिवासी नव्हते. पै कर्नाटकचे तर दंडवते कुटुंब हे अहमदनगरचे. मात्र, कोकणच्या मातीशी ते असे काही एकरूप झाले की तिथले सुपुत्र म्हणून कोकणवासीयांनी त्यांना डोक्यावर घेतले. १९७७ मध्ये जनता सरकार सत्तेत आले तेव्हाचा किस्सा. 

दंडवते खासदार म्हणून निवडून आलेले होते. दिल्लीतील आपल्या घरी ते कपडे धूत असताना काही सनदी अधिकारी आणि काही नेते अचानक आले. अर्धओल्या कपड्यांनिशी दंडवते बाथरूममधून बाहेर आले. तेव्हा, आपल्याला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, हा निरोप द्यायला आम्ही आलो आहोत असे त्यांना त्या माणसांनी सांगितले. शपथ घ्यायला ते एका पत्रकाराच्या स्कूटरवर मागे बसून गेले होते. त्यांच्याकडे स्वत:ची गाडी नव्हती. दंडवते रेल्वे मंत्री झाले. पुढे ते कोकण रेल्वेचे शिल्पकार झाले. खासदार होते तेव्हा ते संसदेत सायकलने जात असत. व्ही. पी. सिंग सरकारमध्ये ते वित्तमंत्री होते, हे पद गेल्यानंतर ते एकदा चारचाकी गाडीसाठी कर्ज घ्यायला बँकेत गेले तेव्हा बँकेचे अधिकारी देशाचे वित्तमंत्री कारसाठी कर्ज घ्यायला आल्याचे पाहून केवळ अवाक् झाले.  त्यांना उत्तम क्रिकेटपटू होता यावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला पाठविले पण नाविकांच्या बंडाच्या निमित्ताने दक्षिण मुंबईत तणाव पसरला, इंग्रज सैनिकांनी गोळीबार केला, त्या घटनेचे साक्षीदार असलेले दंडवते आधी स्वातंत्र्याच्या आणि नंतर समाजवादी चळवळीत सक्रिय झाले. पाचवेळा खासदार, रेल्वेमंत्री, वित्तमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवूनदेखील त्यांनी कोणतीही तडजोड स्वीकारली नाही आणि कोणत्याही मोहाला ते बळी पडले नाहीत. १९७५ मध्ये झालेल्या रेल्वे संपानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने ५० हजार कामगारांना काढून टाकले पण दंडवते रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांना कामावर घेतले. म्हणूनच रेल्वे कर्मचारी जॉर्ज फर्नांडिस यांना आपला नेता तर दंडवते यांना आपला माणूस मानायचे.

भौतिकशास्त्रात एम.एस्सी केलेले दंडवते मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात काही वर्षे प्राध्यापक होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर (राजापूर) झालेल्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार झाले. समाजवादी चळवळीतील अग्रणी नेत्या प्रमिलाताई दंडवते यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणीबाणीच्या काळात दोघांनाही तुरुंगवास पत्करावा लागला. त्यावेळी दोघांनी एकमेकांना दोनशे पत्रे लिहिली. त्या पत्रांतून दोघांच्या ठायी असलेल्या अपार विद्वत्तेचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडते. दोघांवरही कार्ल मार्क्स, महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ते रेल्वेमंत्री असताना दुसऱ्या दर्जाच्या डब्यांमधील लाकडी बाकड्यांना त्यांनी फोम बसविले आणि प्रवाशांना एक आरामदायी भेट दिली. सामान्य प्रवाशांना तो मोठा दिलासा होता. 

Web Title: He was washing his own clothes when the ministry came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.