"घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:47 IST2024-12-08T14:47:25+5:302024-12-08T14:47:38+5:30

ईव्हीएमवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde has responded to the criticism made by the opposition on EVMs | "घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

"घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

DCM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर गंभीर आरोप केले जात आहेत. अशातच सोलापुरच्या मारकडवाडीतही ग्रामस्थांनी आक्रमक होत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे जानकर गटाच्या काही ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचे नियोजन केलं होतं. प्रशासनाच्या नकारानंतर हे मतदान घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. शरद पवार यांनीही मारकडवाडीला भेट देत ईव्हीएमवरुन सवाल उपस्थित केला आहे. यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. मते मिळूनही आम्हाला कमी जागा मिळाल्या असा दावा शरद पवार यांनी केला होता. तसेच या निकालांमुळे लोकांमध्ये शंका निर्माण झाली असल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेण्याचे टाळलं होतं. यावरुनच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? असा सवाल केला आहे.

"यापूर्वी झारखंड, कर्नाटकमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं. आता प्रियंका गांधी सुद्धा जिंकल्या आहेत. जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा खरा म्हणजे दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षाकडे आता कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. मी म्हणालो होतो विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातील जनता चारी मुंड्या चित्त करेल. सर्व घटकांनी राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली आहे. कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ईव्हीएमवरुन विरोधकांना एकनाथ शिंदेंचे आव्हान

“सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत विरोधी पक्षाने नेहमीच त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं. त्यांच्याविरोधात निकाल लागला तेव्हा आक्षेप घेतला. सुप्रीम कोर्टावरही आरोप केले. हे लोकशाहीला घातक आहे. या महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका आहेत, महायुतीचं काम जनतेने पाहिलं आहे. अडीच वर्षांत महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. या योजनांचा परिपाक, या कामांची पोचपावती या निवडणुकीत बघायला मिळाली. विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, रडगाणं थांबवा, रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
 

Web Title: Deputy Chief Minister Eknath Shinde has responded to the criticism made by the opposition on EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.