Deepali chavan suicide case: मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळे गर्भपात झाला; दीपाली चव्हाण यांचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:32 PM2021-03-26T14:32:25+5:302021-03-26T15:09:20+5:30

मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही, असंही दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. (Forest Range Officer Deepali Chavan )

Deepali chavan suicide case: Forest Range Officer Deepali Chavan has made shocking allegations from the suicide note | Deepali chavan suicide case: मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळे गर्भपात झाला; दीपाली चव्हाण यांचा धक्कादायक आरोप

Deepali chavan suicide case: मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळे गर्भपात झाला; दीपाली चव्हाण यांचा धक्कादायक आरोप

googlenewsNext

नागपूर/ मुंबई: मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (३२) यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Forest Range Officer Deepali Chavan)

धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण ( या गुगामल वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांनी अनेक नातेवाइकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही लवकर या, खिचडी करते, असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच, तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सांगितले. त्यामुळे मोहिते हादरुन गेले. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याचपार्श्वभूमीवर उप वन संरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. 

क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीस ही सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले.  अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेले.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, जाणून घ्या..

प्रति रेड्डी साहेब
अपर प्रमुख सरंक्षक
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती

सर ज्यावेळेस धुळघाट मधून माझी बदली हरिसालला झाली होती. तेव्हा मी खूप खुश होते. कारण माझ्यावर चौकशी सुरु असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. जेव्हा मला समजलं होतं की शीवकुमार सर मला DFO आहेत तेव्हा मला अजूनच आनंद झाला. सरांची काम करायची पद्धत मला आवडायची. ते माझ्याशी फार चांगले वागायचे. माझ्या रेंजची सर्व काम सगळ्यात आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे आमची रेंज पुढे जायला लागली तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFO चे कान भरायला सुरुवात केली.

साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे ३ गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात. मार्च २०२० मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले.

जेव्हा गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अॅट्रोसिटी लावतो. चार महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे. या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली आहे. अॅट्रोसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शीफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही.

ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते. माझ्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजूरांसमोर ते मला शिवीगाळ करतात. ते मला सहन होत नाही. त्यामुळे मी हे सांगत आहे. कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलवले. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही.

माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की, माझे रोखलेले वेतन तात्काळ द्यावे. माझ्या मृत्यूनंतरचे आर्थिक लाभ सर्व माझ्या आईला द्यावे. विनोद शिवकुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात. कधी तरी त्यांना गांभीर्याने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचेही नाव खराब होत आहे. त्यांचे अधिकाऱ्यांसोबतचे वागणे खराब आहे. ते खूप घाण घाण शिव्या देतात. फिल्डवर फार त्रास देतात. ते माझ्याशी फार खराब बोलतात. त्याचा मला मानसिक त्रास होतो. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसरक्षक आहेत. साहेब तुम्ही मला आतापर्यंत खूप सपोर्ट केला. तुमचे मनापासून आभार. माझ्या आईला सुखरुप गावी पोचवायला मदत करा आणि विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा. जे माझ्यासोबत झालं ते यापुढे इतर कोणासोबत होऊ नये, असं दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. 

Web Title: Deepali chavan suicide case: Forest Range Officer Deepali Chavan has made shocking allegations from the suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.