दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:01 AM2024-03-21T10:01:02+5:302024-03-21T10:03:46+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच मनसेलाही महायुतीत सहभागी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

confusion among marathi voters over the symbol of political parties in south mumbai | दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम

दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम

स्नेहा मोरे, मुंबई : शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन पक्ष सत्तेत असताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच मनसेलाही महायुतीत सहभागी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बंदद्वार चर्चा केली आणि मनसे महायुतीत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू झाली. लोकसभा निवडणूक मनसे इंजिन या चिन्हावर लढविणार की कमळ हातात घेण्याच्या भाजपच्या आग्रहाला मान देत अस्तित्व टिकविण्यावर भर देणार, याकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई, ठाणे, कल्याणचा दौरा करून आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मानसिक तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मनसेच्या दृष्टीने कळीचा मतदारसंघ आहे. बहुभाषिक मतदार येथे असले तरी भायखळा, शिवडी, वरळी या परिसरांत मराठी मतांचे प्राबल्य आहे. 

निर्णयाकडे लक्ष -

महायुती आणि महाआघाडी यापेक्षा मनसे हा आश्वासक पर्याय मतदारांना वाटत असतानाच मनसेला महायुतीत घेतले जाणार असल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मनसे इंजिन चालू ठेवणार की निवडणुकीपुरता रामराम करणार, अशी कुजबुज मनसेच्या शाखांमध्ये सुरू आहे. मनसे अध्यक्षांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

हातमिळवणीस विरोध -

दक्षिण मुंबईची जागा ‘मनसे’च्या पारड्यात पडल्यास पक्षाला मुंबईसह महाराष्ट्रातील परप्रांतीयांविरोधाला सोडचिठ्ठी द्यावी लागणार आहे. 

परप्रांतीयांचा रोष ओढवून मोठा मतदार समुदाय असलेल्या या वर्गाला दुखावणे भाजपला रुचणारे नाही. भाजपकडून मनसेच्या या भूमिकेविषयी अधिक काळजी घेतली जात आहे; कारण दुसऱ्या बाजूला भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मनसेशी हातमिळवणीबाबत विरोध असल्याचेही उघड आहे.

Web Title: confusion among marathi voters over the symbol of political parties in south mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.