उत्तर भारतीय मतांसाठी स्पर्धा

By Admin | Updated: March 12, 2015 01:12 IST2015-03-12T01:12:33+5:302015-03-12T01:12:33+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. मतदारांना आतापासूनच आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये

Competition for North Indian votes | उत्तर भारतीय मतांसाठी स्पर्धा

उत्तर भारतीय मतांसाठी स्पर्धा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. मतदारांना आतापासूनच आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. विशेषत: भाजपा आणि काँग्रेसमध्ये यासाठीची रस्सीखेच दिसत आहे. उत्तर भारतीय आता महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसपासून दूर जातील, असा कयास बांधत भाजपाने आपला मोर्चा आता उत्तर भारतीयांकडे वळवला आहे.
उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी थेट काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निरुपम
यांना मुंबई अध्यक्ष बनवून काँग्रेसने मोठी चूक केल्याचे त्यांनी म्हटले
आहे.
एका उत्तर भारतीयाला मुंबईचे अध्यक्षपद दिल्याने येथील उत्तर भारतीय महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मत देईल, असे पक्षाला वाटत असेल. मात्र आता ते शक्य नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन उत्तर भारतीय समाज भाजपासोबत जोडला गेला आहे. आणि गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसने उत्तर भारतीय समाजाला केवळ लुटले आहे. त्यांच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकट आले; तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना मदत केलेली नाही, अशी टीका कंबोज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे.
येत्या महापालिका निवडणुकीत भाजपाचा विजय होऊ दे, अशी उत्तर भारतीयांची अपेक्षा आहे. शिवाय उत्तर भारतीयाने महापौर बनावे, याकडेही उत्तर भारतीयांचा कल आहे. परिणामी उत्तर भारतीय समाज येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे कंबोज यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या या टीकेवर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र ‘आगे आगे देखेंगे होता है क्या...’ एवढीच प्रतिक्रिया दिली. परिणामी आता भविष्यात निरुपम काय खेळी खेळतात? याकडे उत्तर भारतीयांसह प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचेही लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Competition for North Indian votes