चतुर्थ श्रेणी कामगारांना जनगणना नको; म्युनिसिपल मजदूर युनियनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:22 IST2026-05-18T08:22:17+5:302026-05-18T08:22:26+5:30

अँड्रॉइड फोन वापरण्याची माहिती नसल्याचा दावा

Class IV workers do not want census; Municipal Mazdoor Union's letter to Chief Minister | चतुर्थ श्रेणी कामगारांना जनगणना नको; म्युनिसिपल मजदूर युनियनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चतुर्थ श्रेणी कामगारांना जनगणना नको; म्युनिसिपल मजदूर युनियनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ कामगारांना जनगणनेच्या कामासाठी पाठविण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनने तीव्र विरोध केला आहे. अशिक्षित असलेल्या कामगारांकडून व अँड्रॉइड फोन वापरण्याची माहिती नसलेल्या चतुर्थ श्रेणीतील कामगारांना या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पत्र लिहून केली आहे. याबाबत त्यांनी महापालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांना निर्देश देण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे. मुंबई शहरामध्ये सध्या जनगणनेच्या नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे काम देशाच्या हिताचे जरी असले, तरी ऐन कडक उन्हाळ्यामध्ये मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांना नेमून दिलेले रोजचे काम करून जनगणनेच्या कामासाठी पाठवून संध्याकाळी उशिरापर्यंत काम करून घेतले जात आहे. चतुर्थ श्रेणी कामगारांमध्ये बहुसंख्य कामगार हे अशिक्षित असून, त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत. काही कामगार फक्त बाहेरून आलेले फोन घेण्यासाठी आणि करण्यासाठी साध्या की-पॅड फोनचा वापर करीत आहेत. 

रोजचे काम आटोपून जनगणनेचे काम दिल्याने नाराजी
भर उन्हात स्वतःचे दिलेले काम पार पाडून सकाळी ११ वाजल्यानंतर जनगणनेच्या कामासाठी त्याच मळक्या गणवेशामध्ये इमारती अथवा टॉवरमध्ये जावे लागत आहे. परंतु, अशा अवस्थेत अनेक नागरिक कामगारांना दरवाजासमोर उभे करीत नाहीत. दुहेरी कामामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, कामगार कोणत्याही क्षणी संघटीत कृती करतील अशी भीती अध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केली आहे. 
त्याबरोबर सध्या मुंबई महापालिकेमध्ये ७५,००० पेक्षा अधिक 
निरनिराळ्या प्रवर्गातील रिक्त जागा असून, कार्यरत असलेल्या कामगारांवर दुप्पट कामाचा बोजा पडत आहे. या कामगारांना जनगणनेच्या कामासाठी पाठविले जात असल्यामुळे मुंबईच्या नागरी सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. 

नागरिकांच्या नोंदी व माहिती संकलनात अडचणी
स्मार्ट फोन वापरून नागरिकांच्या नोंदी आणि इतर माहिती नोंदविणे याचे कौशल्य नसल्यामुळे जनगणनेची माहिती संकलन करून ती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविणे शक्य होणार नसल्यामुळे चतुर्थ श्रेणी कामगार वर्गामध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहितीही  अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली आहे. 

Web Title : नगरपालिका यूनियन ने चतुर्थ श्रेणी कर्मचारियों के लिए जनगणना कार्य का विरोध किया।

Web Summary : नगरपालिका मजदूर यूनियन ने अशिक्षित और स्मार्टफोन कौशल की कमी के कारण चतुर्थ श्रेणी के कर्मचारियों को जनगणना कार्य सौंपने का विरोध किया, जिससे नागरिक सेवाएं बाधित हो सकती हैं।

Web Title : Muncipal Union opposes census work for Class IV employees.

Web Summary : Muncipal Mazdoor Union opposes assigning census duties to Class IV employees due to lack of education and smartphone skills, potentially disrupting civic services.